खेड तालुका परिसरात वाहतूक नियम जनजागृती अभियान

0
30 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत विविध शाळांमध्ये राबविला उपक्रम
महिंद्रा व्हेईकल, यश फाऊंडेशनतर्फे सुरक्षेविषयी दिली माहिती
चाकण : महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन, चाकण ता. खेड यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुका व चाकण शहर परिसरात 30 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा (4 ते 10 फेब्रुवारी 2019) सप्ताहाअंतर्गत वाहतूक नियम जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शुक्रवारी हा उपक्रम कन्या विद्यालय आणि मॉडर्न  हायस्कुल भोसे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात. त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न सध्या ऐरणीवर आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे. प्रामुख्याने वस्ती पातळीतील नागरिक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, कंपनीतील कर्मचारी, शासकीय कर्मचारी, ट्रक ड्रायव्हर यांना रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. या उद्देशाला साध्य करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वाहतूक नियम जनजागृती मानवता साखळीद्वारे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत रस्ता सुरक्षाचा संदेश विद्यार्थ्यांच्या व महिंद्रा स्वयंसेवकांच्या सहाय्याने पोह्चविण्यात आला.
महिंद्राच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महिंद्राचे अधिकारी जॉन डीजा, मार्शल थॉमस, रणजीत पाटील, सनी लोपेज, संतोष उणव्हे, कन्या विद्यालय मुख्याध्यापिका पूनम घाटपांडे, मॉडर्न हायस्कुल मुख्याध्यापिका नीता वर्मा यांनी विद्यार्थी व कंपनीतील कर्मचारी यांच्या समवेत प्रतिज्ञा घेतली. चाकण-पुणे महामार्गावर वर ‘अती घाई, संकटात नेई’, ‘डोके आहे सर्वात नाजूक, हेल्मेट लावून व्हा जागरूक’, ‘आवरा वेगाला, सावरा जीवाला’ अशी उद्बोधक घोषवाक्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा जनजागृतीपर संदेश देण्यात आला. या मानवता साखळीमध्ये 400 विद्यार्थी, शालेय शिक्षक वृंद व 200 महिंद्रा कंपनीतील कर्मचारी उपस्थित होते.
घेण्यात आलेली प्रतिज्ञा अशी
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त या विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली. चला, आपण सर्वजण प्रयत्न करू या. आपल शहर अपघातमुक्त बनवूया असा संकल्प करण्यात आला. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमिताने आम्ही शपत घेतो की, वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन आम्ही करू. वाहन चालवितांना वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेऊ. चुकीच्या दिशेने वाहन चालविणार नाही. वाहतूक सिग्नलचे काटेकोरपणे पालन करू. वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणार नाही. स्वतःच्या सुरक्षासाठी सीट बेल्ट व हेल्मेटचा वापर आवश्य करु. चला मग, आपण सर्वजण सुरक्षा आपली जबाबदारी समजून प्रामाणिकपणे आपल शहर अपघात मुक्त बनविण्याचा प्रयत्न करू या.