चाकण : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खेड तालुक्यातील महत्त्वाच्या तीन रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी केंद्र सरकारकडून तीन हजार 615 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्राकडून मंजूर झालेल्या निधीतून तळेगाव-चाकण-शिक्रापूर या प्रमुख रस्त्यासह पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे नाशिक फाट्यापासून 29.8 किलोमीटर अंतरापर्यंत सहापदरीकरण करणे, धार्मिक पर्यटन स्थळांना जोडणारा सरलगाव-भीमाशंकर-वाडा-खेड या 138 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी दिली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सहकार्याने या रस्त्यांच्या प्रलंबित कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता, असेही आमदार गोरे यांनी सांगितले.
औद्योगिक क्षेत्र विस्तारले
तळेगाव, चाकण, रांजणगाव औद्योगिक क्षेत्राचा दिवसेंदिवस मोठा विस्तार होत आहे. औद्योगिक क्षेत्र वाढल्याने या परिसरातील अवजड वाहतूकदेखील वाढली आहे. वाढत्या वाहतुकीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा रस्ता अतिशय वर्दळीचा आणि धोकादायक बनला आहे. धोकादायक रस्त्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. या विषयासंदर्भात आमदार गोरे यांनी हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता. खेड तालुक्यातील इतर रस्त्यांबाबतही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले होते.
सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर
आमदार गोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर माहिती देताना राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी, तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा प्रमुख रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने केंद्र सरकारकडे याबाबत राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जाणार आहे, असे उत्तर दिले होते. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने या रस्त्यासाठी 1800 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सदर रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असून, लवकरच प्रकल्प अहवाल पूर्ण होणार आहे. त्यानंतर लगेच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे आमदार गोरे यांनी सांगितले.
273.8 कि.मी. अंतराचे काम
केंद्र सरकारने पुणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी एकूण 15 हजार 139.00 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी खेड तालुक्यातील रस्त्यांसाठी तीन हजार 615.00 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर-न्हावरा-चौफुला राज्यमार्ग या 106 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी एक हजार 799.00 कोटी, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग नाशिक फाटा येथून 29.8 किलोमीटर अंतरापर्यंत सहापदरी करण्याच्या कामासाठी 950.00 कोटी, धार्मिक पर्यटन स्थळांना जोडणारा सरलगाव-भीमाशंकर-वाडा-खेड या 138 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी 966.00 कोटी असा, या भागातील 273.8 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांसाठी एकूण तीन हजार 615 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचेही आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले.