गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा
मुंबई :- खेड तालुक्यातील ऐनवली-मोहाने येथील मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला व तिची हत्या केली. परंतु पोलीसांनी मुलीने आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करून हे प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न सुरु केला.या प्रकरणी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधीव्दारे प्रश्न उपस्थितीत होताच गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी या प्रकरणाची आठ दिवसात सीआयडी मार्फत चौकशी सूरू करण्यात येईल. तसेच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निलंबित करुन त्यांची चौकशी केली जाईल अशी घोषणा करत आंदोलकांशी चर्चा न करता त्यांच्यासमोर निघून जाणारे रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक यांना सौजन्यपणे वागण्याची समज देण्यात येईल असे केसरकर यांनी सभागृहात सांगितले. या प्रकरणी तातडीने कारवाई व्हावी यासाठी शिवसेनेच्या आमदारांसह विरोधकांनी आक्रमक होवून अध्यक्षांच्या आसनासमोर येत घोषणाबाजी केली.
विधानसभेत शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनिल प्रभू, आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधीव्दारे खेड तालुक्यातील ऐनवली-मोहाने येथील अंकिता सुनिल जंगम हिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह कुडोशी गावातील नदीपात्रात फेकून दिला. ही घटना २८ डिसेंबर २०१७ रोजी घडली. त्यानंतर या मुलीच्या हत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ व ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले. या प्रकरणी खेड पोलीसांनी मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली व एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले.पाच आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.
आरोपींची स्वीफ्ट कार जप्त केली नाही
आमदार सुनिल प्रभु म्हणाले की, मुलीचा खून करून आरोपी स्वीफ्ट कार मधून फरार झाले. या कारचा नंबर पोलीसांना दिल्यानंतरही पोलीसांनी कार जप्त केली नाही. गगनगिरी कात इंडस्ट्रीजच्या मालकाच्या मुलाचा यामध्ये हात असून आरोपी म्हणून त्यास अटक करून सोडून दिले. या प्रकरणी तपासणीस अधिकाNयाची चौकशी झाली पाहिजे. तसेच डॉक्टराने पोस्टमार्टमचा खोटा अहवाल दिल्याने त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक हे आंदोलन सूरू असतांना जवळून गेले परंतु आंदोलकांची भेट घेण्याचे सौजन्य दाखवले नाही. या सर्व प्रकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी प्रभू यांनी केली.
प्रकरण दाबण्यासाठी एक कोटीचा व्यवहार
मुलीच्या खुनाचे प्रकरण दाबण्यासाठी पोलीसांना हाताशी धरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलीस निरीक्षक, पोलीस उपअधिक्षक यांना एक कोटी रूपये वाटल्याची चर्चा सूरू असल्याची माहिती आमदार सुभाष साबणे यांनी सभागृहात दिली. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले पोलीस प्रशासन निर्ढावले आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. कंपनीच्या मालकाने केलेले हे प्रकरण असून ते दाबण्याचा प्रयत्न होत आहे.या प्रकरणाची नि:पक्षपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस निरीक्षकास निलंबीत करण्याची मागणी केली.
शिवसेनेच्या आमदारांसह विरोधक आक्रमक
गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी या प्रकरणी आठ दिवसात सीआयडी चौकशी सूरू केली जाईल. तसेच पोलीस निरीक्षकास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल असे सांगताच शिवसेनेच्या आमदारांसह विरोध पक्षाचे आमदार आक्रमक झाले. अध्यक्षांच्या आसनासमोर येत जोरदार घोषणाबाजी सूरू केली.आमदार आक्रमक झाल्यामुळे तालिका अध्यक्षांनीही आमदारांच्या भावना लक्षात घ्याव्यात अशी सूचना केली. गृहराज्यमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आठ दिवसात सीआयडी चौकशी सूूरू केली जाईल. तसेच पोलीस निरीक्षकास निलंबीत करून त्याचीही चौकशी करण्यात येईल.कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या सर्वांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.