चाकण : संपूर्ण पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्यात कधी नव्हे एवढा उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने उन्हाच्या काहिलीने जीवाची लाही-लाही होत आहे. गेल्या चार, पाच दिवसांपासून वातावरण अचानक बदल होऊन ऊन व उकाडा वाढला आहे. या उकाड्याने घरात आणि बाहेरही झाडाच्या सावलीतही गरम हवेने नकोसे केले आहे. तापमानाने एकदमच चाळिशीचा पारा गाठला आहे. या वाढलेल्या उन्हाच्या उकाड्याने शेतीची कामे करण्यात अडचणी येत आहेत. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे वाढलेल्या उन्हामुळे पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ होऊन पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे परिसरावर पाणीटंचाईचे सावट आहे.
…सह्याद्रीची रांग केली बोडकी
खेड तालुक्यात तीन मोठी धरणे आहेत. मात्र, अर्ध्या तालुक्यातील जनता पाण्यासाठी दाही दिशा फिरत आहे. धरणांमुळे शेतीला व पिण्यासाठी पाणी कमी पडत नसले तरी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने धरण परिसरातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होत आहे. पूर्वी तापमान 35 अंशांपेक्षा जास्त नसायचे. मात्र खेड तालुक्यात मोठ्या संख्येने कारखानदारी उभी राहिली. तसेच सह्याद्रीच्या डोंगर परिसरात पवनचक्क्यांसाठी बेसुमार वृक्ष कत्तल करण्यात आले. याचा परिणाम जाणवायला लागल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत. या वर्षी उन्हाळा सुरू होण्या अगोदरच तापमान चाळिशीच्या पुढे असल्याने खेड्यापड्यातील गावात, शेतात, शहरातील गल्लीबोळात, रस्त्यावर, महामार्गावर सुध्दा शुकशुकाट दिसून येत आहे.
…शेतीकामावर झाला परिणाम
पाच, सहा दिवसांपासून अधूनमधून ढग आल्यावर उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन उन्हाचा तडाखा वाढत आहे. शेतात काम करणारे शेतकरी, मजूर दुपारी बारा वाजेपर्यंत काम करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना कांदा व उन्हाळी बाजरी, भूईमूग कुरपणी आदी प्रकारची कामे वाढलेल्या उन्हाच्या झळानी करता येत नाही. मजूरही काम दिवसभर करण्यास नकार देत आहेत. शेतकरीही त्यांना अर्धाच पगार देवून काम करून घेवू लागले आहे.
…अबालवृद्ध घरीच तळ ठोकून
दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनाही उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. चारचाकीत एसी चालू असला तरी म्हणावा एवढा गारवा मिळत नसल्याचे वाहन चालक सांगतात. सकाळी आठनंतर उन्हाचा कडाका सुरू होतो ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाणवतो. लहान मुलांसह मोठी माणसही घरातच कुलर, पंखे लावून आराम करताना दिसत आहेत. मागील वर्षात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही मार्च महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील अनेक वाड्यावस्त्यांना पाणी टंचाईनिर्माण झाली आहे. वाढलेल्या उन्हाच्या कडाक्याने लहान मुलांसह मोठ्यांनाही लाही लाही होते माझ्या अंगाची…असे म्हणण्याची वेळ आली आहे. उष्णतेच्या दाहकतेमुळे शीतपेयांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
… ही घ्या दक्षता
– दुपारी 12 ते 3 उन्हात फिरू नये. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये. मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नये. तहान नसल्यास ही पुरेसे पाणी प्या. सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरावे. घराबाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी वापरा. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, झडपा, सनसेड बसवावेत. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादी घ्यावे.