महिला व बालकल्याण विभागाच्या पीठ गिरणी वाटप गैरव्यवहाराचे प्रकरण
राजगुरूनगर : खेड पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत पीठ गिरणी वाटपात 12 लाख 33 हजार 789 रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पंचायत समितीचे तत्कालीन वरिष्ठ सहायक सिद्धार्थ पोपट कडलग (वय 59, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. खेड पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सन 2015 ते 2016 या वर्षात लाभार्थींना पीठ गिरणी वाटप करण्यात आले होते. लाभार्थी निवड करताना मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. दिलेल्या पीठ गिरणीची माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्यावरून पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रमेश शंकर इष्टे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
228 लाभार्थींना गिरण्यांचे वाटप
खेड पंचायत समितीकडून पीठ गिरण्यांसाठी 323 प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यातील 228 लाभार्थींना पीठ गिरणी वाटप झाल्या. हे सर्व वरिष्ठ सहाय्यक सिद्धार्थ कडलग हे कार्यरत असताना घडले होते. कडलग काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी आपले दप्तर नव्याने पदभार स्वीकारणार्या संबंधित अधिकार्याकडे त्या दिवशी सोपविणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे न करता जवळपास चार महिने त्यांच्याकडे असलेले दप्तर व इतर माहिती न देता टाळटाळ केली. शासनाच्या महिला व बालकल्याण योजनेतून जिल्हा परिषदेमार्फत गरीब, गरजू लाभार्थींना 10 टक्के रक्कम भरून विविध साहित्याचे वाटप केले जाते. पंचायत समितीमार्फत लाभार्थींची निवड करताना वरिष्ठ सहाय्यक हे प्रस्ताव तयार करतात. त्याला बाल विकास प्रकल्प अधिकार्यांची मंजुरी लागते. तसे प्रस्ताव जिल्हा परिषदेला अंतिम मंजुरीसाठी पाठवले जातात. ही मंजुरी मिळाल्यावर निवड झालेल्या लाभार्थींना साहित्य वाटप केले जाते.
गिरणी वाटपात अनियमितता
सिद्धार्थ कडलग यांनी 57 लाभार्थींना जिल्हा परिषदेची मंजुरी नसताना पीठ गिरणीचे वाटप केले. 11 लाभार्थींचे दुबार प्रस्ताव आल्याचे कारण सांगून त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविले नसताना त्यांनाही गिरणी वाटप केल्या. दोन लाभार्थींचे प्रस्ताव नसताना केवळ कोणत्या तरी जिल्हा परिषद सदस्यांनी तोंडी सांगितले म्हणून गिरणी दिल्या. सात लाभार्थींनी 12 हजार 400 रुपये अशी 10 टक्के रक्कम दिली. मात्र, ती पंचायत समितीच्या खात्यावर जमा केली नाही, अशी माहिती उघड झाली.
अंतरिम जामीन नाकारला
कडलग यांच्या या कृतीविरोधात कक्षाधिकारी रमेश इष्टे यांनी पंचायत समितीच्या वतीने 31 एप्रिल 2017 रोजी खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागून कडलग यांनी अंतरिम जामीन मिळवला होता. मात्र, कागदपत्रांची शहानिशा व वस्तुस्थितीची माहिती घेऊन न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के करत आहेत.