राजगुरुनगर : येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळास आदिवासी व ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सुमारे 50 लाखांचा धनादेश मुंबईच्या पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नुकताच देण्यात आला. आमदार दिलीप वळसे पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी 8 जानेवारी 2016साली शरद पवार यांनी खेड तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेता यावे याकरिता शिष्यवृत्तीसाठी सुमारे 50 लाख रुपये ठेव स्वरुपात देणगी म्हणून देण्याची घोषणा केली होती. याची पूर्तता करताना खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी या धनादेशाचा स्वीकार मुंबई येथील ट्रस्टच्या कार्यालयात नुकताच केला.
या 50 लाख रुपयांच्या व्याजातून पुढील शैक्षणिक वर्षापासून आदिवासी व खुल्या वर्गातील गुणवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी व विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले, शारदाबाई पवार, दत्तात्रेय वळसेपाटील व साहेबराव बुट्टेपाटील यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. बुट्टेपाटील यांनी दिली.