खेड शिवापूर येथे लवकरच उभा राहणार शेतकरी बाजार

0

खेड शिवापूर । पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खेड शिवापूर येथे लवकरच शेतकरी बाजार सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करून परवानगीसाठी पणन संचालनालयाकडे लवकरच पाठविण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासनक दिलीप खैरे आणि सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिली आहे.

5 एकर क्षेत्र बाजार समितीसाठी
हवेली तालुक्यातील खेड शिवापूर येथे 5 एकर क्षेत्र बाजार समितीचे तत्कालीन सभापती स्वर्गीय शिवाजीराव कोंडे यांनी संपादित केली होते. भोर, पुरंदर आणि वेल्हा तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीमाल विक्रीसाठी जवळ बाजार पेठ उपलब्ध व्हावी, या हेतूने ही जागा संपादित करण्यात आली होती.

मांजरी येथेही बाजार समितीचा उपबाजार
अनेक वर्षांपासून ही जागा तशीच पडून आहे. जागेचे विकसन होणे रखडले आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीच्या विद्यमान पदाधिकार्‍यांनी ही जागा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकरी ते थेट ग्राहक हा फळे आणि भाजीपाला बाजार सुरू करण्यात येणार आहे. याविषयी खैरे म्हणाले, येथे शेतकरी बाजार सुरू करण्याबाबतचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर शेतकरी, बाजार घटकांशी चर्चा करून अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. तो आराखडा मंजुरीसाठी पणन संचनालयाकडे पाठविण्यात येणार आहे. मांजरी येथेही बाजार समितीचा उपबाजार सुरू आहे. मात्र, तेथे अनेक उणीवा आहेत. या उणीवा राहू नये, यासाठी या आराखड्यामध्ये प्रयत्न करण्यात येणार आहे.

100 टन क्षमतेचा वजनकाटा उभारणार
सध्याच्या प्राथमिक आरखड्यामध्ये फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी 650 चौरस मीटरचे तीन हॉल, प्रशासकीय इमारतीमध्ये तळमजल्यावर शेतीपुरक व्यवसायासाठी 25 दुकाने, पहिल्या मजल्यावर 155 चौरस मीटचे 4 हॉल, तिसर्‍या मजल्यावर 620 चौरस मीटरचे शेतकरी निवास तसेच प्रशासकीय इमारतीच्या बाजूला 325 चौरस मीटरची दोन शीतगृहे आणि 325 चौरस मीटरचे गोडावून असा बाजार आवार उभारणे प्रास्तावित आहे. भुसार बाजारासाठी 350 चौरस मीटरचे 10 ओपन प्लॉट, वाहनांच्या पार्कींगसाठी 3 हजार चौरस मीटरचे बहुमजली वाहनतळ आणि 100 टन क्षमतेचा वजनकाटा उभारण्याचेही प्रास्तावित आहे.