खेलरत्न सरदारसिंगला मिळाला भारतीय संघातून डच्चू

0

नवी दिल्ली । पुढील महिन्यात भुवनेश्‍वर येथे होणार्‍या जागतिक हॉकी लीग फायनल स्पर्धेसाठी भारतीय संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. या संघातून अनुभवी मिडफिल्डर सरदारसिंगला डच्चू देण्यात आला आहे. अन्य खेळाडूंमध्ये रुपिंदर पाल सिंग आणि विरेंद्र लाक्रा फिट ठरल्यामुळे त्यांचे संघात पुनरागमन झाले आहे. हॉकी खेळातील चांगल्या कामगिरीसाठी 2017 मध्ये खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या सरदार सिंगला संघातून वगळल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. संघातून अशाप्रकारे झालेल्या गच्छंतीकडे त्याच्या कारकिर्दीचा शेवट म्हणून पाहीले जात आहे. भारताने नुकत्याच जिंकलेल्या आशिया चषक स्पर्धेत मिडफिल्डमध्ये मोलाची भुमिका बजावताना सरदार सिंग युवा कर्णधार मनप्रीतसिंगसह बचावफळीत खेळला होता. जागतिक हॉकी लीग फायनलसाठी संघातून वगळल्यामुळे संघाचे नवीन मार्गदर्शक शॉर्ड मारिन यांच्या रणनितीसाठी सरदार फिट बसत नसल्याचे बोलले जात आहे.

मारिन यांनी आशिया चषक स्पर्धेच्याआधी रॉलेंट ऑल्टमेंस यांची हकालपट्टी झाल्यावर भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची धुरा सांभाळली होती. निवड समितीने मनप्रीतसिंगला संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवले आहे. चिंगलसेना संघाचा उपकर्णधार असेल. पी आर श्रीजेश अजूनही पुर्णपणे फिट नसल्यामुळे गोलकिपींगची जबाबदारी आकाश चिकटे आणि सूरज करकेराला सांभाळावी लागेल. मिडफिल्डमध्ये एस.के. उथप्पा, कोथाजित सिंग, सुमितच्या जोडीने मनप्रीत आणि चिंगलसेनाचा समावेश आहे. संघाचे मार्गदर्शक मारिन म्हणाले की, अनुभवी आणि युवा खेळाडूंचे मिश्रण असलेला संघ आहे. युवा खेळाडूंना जगातील आघाडीच्या देशातील खेळांडूविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळेल. प्रत्येक सामना अंतिम सामना म्हणून खेळायला लागणार असल्यामुळे त्यात कुठल्याही प्रकारच्या चुकीला जागा नसेल.

भारतीय संघ : गोलकिपर : आकाश चिकटे, सूरज करकेरा. डिफेंडर : हरमनप्रीत सिंग, अमित रोहीदास, दिप्सन टर्की, वरूणकुमार, रुपिंदरपाल सिंग, विरेंद्र लाक्रा. मिडफिल्डर : मनप्रीतसिंग (कर्णधार), चिंगलेसेना सिंग, एस.के. उथप्पा, सुमीत, कोथाजित सिंग. फॉरवर्ड : एस. वी सुनील, आकाशदीप सिंग, मनदीपसिंग, ललित उपाध्याय.