पुणे : केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये आयोजित ‘खेलो इंडिया’ महोत्सवाला महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील मैदानावर ९ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान या महोत्सवातील हॉकीच्या लढतींना आजपासूनच सुरुवात होत आहे. मुलांचे सामने मुंबई येथील महिंद्र स्टेडियमवर होणार असून मुलींचे सामने पुण्यातील एनडीए स्टेडियमवर आयोजित केले जाणार आहेत.
मुलांच्या १७ वषार्खालील गटात महाराष्ट्राला साखळी अ गटात उत्तरप्रदेश, दिल्ली, ओडिशा यांच्यासमवेत स्थान देण्यात आले आहे. साखळी ब गटात झारखंड, हरयाणा, चंडीगढ, पंजाब यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची सोमवारी दिल्ली संघाबरोबर गाठ पडणार आहे.
पहिल्या दिवशी ओडिशा व उत्तरप्रदेश हा सामना होणार आहे. या गटातील उपांत्य फेरीच्या लढती ११ जानेवारी रोजी होणार असून अंतिम व तिस-या क्रमांकासाठी १३ जानेवारी रोजी सामने होतील. युवकांच्या २१ वषार्खालील विभागात महाराष्ट्राला साखळी ब गटात हरियाणा, ओडिशा, झारखंड यांच्याशी खेळावे लागणार आहे. साखळी अ गटात पंजाब, उत्तरप्रदेश, चंडीगढ व दिल्ली यांना स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना ८ जानेवारी रोजी ओडिशा संघाबरोबर होईल. या गटातील उपांत्य फेरीच्या लढती १२ जानेवारी रोजी होणार असून अंतिम व तिस-या क्रमांकासाठी १४ जानेवारी रोजी सामने होतील.