खेल खेल में… होतोय जीवनाचा ‘गेम’!

0

आता हेच ‘गेम’ खेळता खेळता जीवनाचा खेळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘ब्ल्यू व्हेल’ या जीवघेण्या गेममुळे मुंबईतील अंधेरी परिसरात शेर ए पंजाब कॉलनीमध्ये राहणार्‍या 14 वर्षाच्या मनप्रीत सहानने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची पहिलीच घटना घडली आहे. मुंबईतील 1 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेने सध्या ‘ब्ल्यू व्हेल’ सर्वत्रच चर्चेचा विषय बनला आहे. विशेष बाब म्हणजे रशियातील 100 हून अधिक मुलांनी या गेमपायी आत्महत्या केली आहे. आतापर्यंत ज्या मुलांनी आत्महत्या केली ती सर्व मुले 12 ते 16 वयोगटातली असल्याचे समजत आहे. आतापर्यंत हा गेम भारतात लाँच करण्यात आलेला नाही. असे असले तरी अशा जीवघेण्या खेळांपासून पालकांनी मुलांना दूर ठेवावे. सध्या सोशल मीडियावर याबाबत अर्लट मेसेजेसही व्हायरल होत आहेत. एकीकडे तंत्रज्ञानाने मानव अशक्य गोष्टी शक्य करू लागला आहे. तर दुसरीकडे मात्र, याच तंत्रज्ञानाचा गैरवापर विघातक कृत्य वाढीस कारणीभूत ठरत आहे. तंत्रज्ञानाचा, एकूण ऑनलाईन, इंटरनेटचा वापर विधायक बाबींसाठी होणे गरजेचे आहे. मात्र, सद्सदविवेकबुद्धी गहाण ठेवून उच्च तंत्रज्ञान अवगत असलेले तंत्रज्ञच आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करताना पाहायला मिळतात. याची अनेक उदाहरणे देता येतील. असो; तर मुलांकडून मोबाइल फोनचा खेळांसाठी अतिवापर होत आहे. मुलांनी खेळावे, बागडावे, आनंदी रहावे या गोष्टी बालवयात होणे, हे नैसर्गिक आहे. मात्र, या बालवयातच त्यांना जर मोबाइल फोनचे वेड लागले, अर्थात व्यसन लागले तर, मात्र इथे पालकांची जबाबदारी आणखी वाढते. ती कशी? तर किशोरवयीन मुलांची बुद्धी बालीश असते. त्यामुळे आपली मुले मोबाइलवर नेमका कोणता गेम खेळतात, याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. मुलांशी वेळोवेळी संवाद साधायला हवा. त्यांना ओरडण्यापेक्षा समजून घेतले पाहिजे. दुसरी बाब म्हणजे आपली मुले मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली जर कोणती गोष्ट करत असतील तर त्यांना रोखले पाहिजे. चांगले काय, वाईट काय हे त्यांच्या वयाचे होऊन त्यांच्या भाषेत जर सांगितले. तर त्यांना ते पटकन समजते. याचे चांगले परिणाम आपल्या मुलांच्या दैनंदिन जीवनावर होतात. मुलांच्या प्रत्येक अ‍ॅक्टिव्हीटीवर पालकांनी लक्ष दिल्यास मुलेही चुकीची पाऊले उचलण्यापासून प्रवृत्त होतील. अर्थात वाईट-वाकडे पाऊल टाकणार नाहीत. जसे मुंबईतील मनप्रीतने उचलले. या घटनेनंतर ‘ब्लू व्हेल’ या गेमविषयी अनेक माध्यमांतून अनेक गोष्टी पुढे आल्या. रशियामध्ये तब्बल 130 मुलांनी या गेममुळे आत्महत्या केल्याची बाब समोर आली. आणि या जीवघेण्या गेमबाबत पोलीस कोणतीही अधिकृत घोषणा करत नाहीत. असो. तर या खेळाविषयी सांगायचेच झाले तर हा गेम रशियाच्या एका तरुणाने तयार केला आहे. आता त्याला अटकही केली आहे. परंतु, त्याचा हा गेम तयार करण्यामागचा हेतू असा होता की, या जगात काही कमजोर लोक आहेत की त्यांना जगण्याचा अधिकार नाही, त्यांना संपविण्यासाठी त्याने हा गेम तयार केला होता. 1993 साली रुपेरी पडद्यावर झळकलेला आणि प्रचंड यश मिळविलेला महेश कोठारे निर्मित ‘झपाटलेला’ या चित्रपटातील खलनायक अर्थात ‘तात्या विंचू’ ज्या व्यक्तिच्या छातीवर हात ठेवून मंत्र म्हणायचा आणि जर भीतीने त्या व्यक्तीचा जीव गेला तर तात्या म्हणायचा की ‘कमजोर दिलाचा मेला’… त्याचप्रमाणे कमजोर दिलाच्या व्यक्तींना जगायचा अधिकार नाही म्हणून ‘ब्ल्यू व्हेल’ या गेमच्या निर्मात्याने अनेकांना संपवून टाकण्याच्या मानसिकतेतून या खेळाची निर्मिती केली. विकृत मानसिकतेतून निर्माण झालेली कोणतीही गोष्ट ही विस्फोटक असते. त्याचे परिणाम हे जगाला भोगावेच लागतात. एवढेच नाही तर निर्मात्यालाही याची संपूर्ण किंमत मोजावी लागते. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे ‘ब्ल्यू व्हेल’च्या निर्मात्याला झालेली अटक. एवढ्या जणांचे जीव जाताहेत हे त्याला माहिती असूनही या गोष्टीचा ‘तो’ निखळ आनंद घेत होता. ही बाब खरोखरच अत्यंत घृणास्पद नाही का?

हल्ली व्यावसायिक हेतू समोर ठेऊन निर्माते मोबाइल गेमची निर्मिती करतात. मोबाइल गेम्स डेव्हलप करणार्‍या अनेक नामांकित कंपन्या आता अस्तित्वात आहेत. केवळ मोबाइल गेम्स डेव्हलप करून नफा कमावणार्‍या कंपन्या म्हणजे सर्जनशीलता आणि मार्केटिंग यांचा उत्तम मिलाफ आहे; परंतु, त्याच वेळी फ्रिलान्स डेव्हलपर्सनी तयार केलेले गेम्ससुद्धा चलतीत आहेत. आता तर स्वत:चा असा गेम तयार करायचा असेल तर ते शक्य आहे. अर्थात त्यासाठी मेहनत, सहनशीलता, चिकाटी आणि अर्थात सर्जनशीलता आवश्यक आहे.

नेमका कसा आहे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम  
हा एक व्हिडीओ गेम असून, रशियामधून या खेळाची सुरुवात झाली. या गेममध्ये मुला-मुलींना सोशल मीडियावरून संपर्क करण्यात येतो. हा गेम खेळणं सुरु केल्यानंतर खेळाडूला एक ‘मास्टर’ मिळतो. हाच मास्टर यूजर्सला पुढचे 50 दिवस कंट्रोल करतो. तो यूजरला दररोज एक टास्क देतो. ज्यामध्ये यूजरला स्वत:च्या शरीराला त्रास द्यायचा असतो. प्रत्येक आव्हान पूर्ण झाले की, त्याचा पुरावा प्लेअर्सला द्यावा लागतो. या खेळाचा शेवटचा टप्पा असतो आत्महत्या करण्याचा. जर प्लेअर्सने ते आव्हान पूर्ण केले नाही तर त्यांना धमकीचे मेसेजही येतात.

टास्क म्हणजे काय? 
हातावर ब्लेडने ब्ल्यू व्हेलचे चित्र रेखाटणे, हाताच्या नसा कापणे, ओठांवर ब्लेडने कापणे, पहाटे एखाद्या उंच ठिकाणी जाणे, पहाटे उठून हातावर वार करणे, हॉरर चित्रपट पाहणे आणि रात्रभर जागणे, गच्चीवरून उडी मारणे, कुटुंब व मित्रांशी संपूर्ण संबंध तोडणे. दुर्दैव म्हणजे एकदा का हा गेम डाऊनलोड केला की तो डिलिट किंवा अनइन्स्टॉलही करता येत नाही, असेही एका इंग्रजी वेबसाईटने म्हटले आहे. यामुळे युजर्सची पर्सनल माहितीदेखील हॅक होण्याची दाट शक्यताही असते.फ
सुनील आढाव – 7767012211