रोहतास : बिहारमधील चिताव गावामध्ये दिनारा ठाणे क्षेत्रातील एका घटनेत सहा लहान मुलांनी खेळता-खेळता विष प्यायल्याची घटना घडली आहे. यापैकी एका ५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य ५ जणांची प्रकृतीही गंभीर आहे.
दुर्गा, पीयूष कुमार, अभय कुमार, नंदनी कुमारी, सीमा कुमारी,आणि सुमन अशी मुलांची नावे आहेत. सर्व मुलांना रुग्णालयात दाखल केले आहे. यापैकी दुर्गा हिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. इतर मुलेही गंभीर स्थितीत आहेत. या मुलांना खेळता-खेळता कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एल्ड्रिन नावाच्या कीटनाशकाची एक बाटली सापडली. ती शक्तिवर्धक औषधाची बाटली आहे, असे समजून सर्वच मुलांनी त्यातील थोडे-थोडे औषध प्यायले. या प्रकारानंतर काही वेळाने या सर्व मुलांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या पालक घाबरले.
त्यांनी विष प्यायल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. खेळता-खेळता केलेला उपद्व्याप या सर्व मुलांच्या जीवावर बेतला आहे.