खेळांवरील जीएसटी कमी करा

0

नवी दिल्ली । एक देश एक करप्रणाली असा आवाज देत 1 जुलैपासून देशात गुड अ‍ॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स, जीएसटी लागू केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम हे कळायला अजून काही दिवस जावे लागतील. पण, जीएसटी देशातील क्रीडा क्शेत्रावर विपरीत पडणार असल्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. जीएसटीमुळे क्रीडा स्पर्धा, क्रीडा साहित्यावरील वाढलेल्या करांना होणारा विरोध पाहिल्यावर केंद्रीय क्रीडा मंत्रालयालाही आता जाग आली आहे. क्रीडा मंत्रालयाचे सचिव इंजेती श्रीनिवासन यांनी अर्थ मंत्रालयाला पत्र लिहून क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा साहित्यावर जीएसटीमुळे लागला जाणारा मोठ्या स्वरुपातला कर कमी करण्याची विनंती केली आहे. अर्थ मंत्रालयाचे महसुल सचिव हसमुख अधिया यांना लिहिलेल्या पत्रात, जीएसटीमुळे देशात क्रीडाक्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात खेळांचा विकास होणार नाही, देश त्यात मागे पडेल. असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय या पत्रात क्रीडा साहित्यावर 5 टक्के जीएसटी आकारण्याची विनंती केली आहे. क्रीडा मंत्रालयाने पाठवलेल्या या पत्राला अर्थ मंत्रालयाकडून अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. क्रीडा मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रामुळे क्रीडा साहित्यावर लावण्यात आलेला एवढ्या मोठ्या प्रमाणातला कर कायम राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळांचा विकास व्हावा म्हणून देशात सुरू केलेल्या विविध क्रीडा योजना फसण्याची शक्यता आहे.

5 टक्के व्हॅट लागू होता
अर्थ मंत्रालयाला लिहीलेल्या पत्रात याआधी कस्टम ड्युटी वगळता व्हॅट कायद्यानुसार केवळ 5 टक्के कर आकारला जात होता. काही साहित्यांवर कस्टम ड्युटीही माफ करण्यात आली होती याची आठवण करुन देण्यात आली आहे. जीएसटी लागू झाल्यावर बहुतेक क्रीडा साहित्य 12 ते 28 टक्के कराच्या कक्षेत आले आहे.

खेलो इंडिया अभियान
या पत्रात मोदी सरकारने सुरू केलेल्या खेलो इंडिया अभियानाची आठवण अर्थ मंत्रालयाला करून देण्यात आली आहे. खेलो इंडिया अभियानानुसार क्रीडा मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने एकत्रितपणे खेळ आणि शारीरिक शिक्षण पहिलीपासून 10 वीपर्यंत लागू करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राष्ट्रीय क्रीडा धोरणानुसार अपेक्षित लक्ष्य गाठण्यासाठी खेलो इंडिया अभियानांर्तगत राष्ट्रीय पातळीवर आंतर शालेय आणि विद्यापीठीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे क्रीडासाहित्य आणि सुविधांवर लावण्यात आलेला भरपूर कमी करण्यात यावा जेणेकरून नागरिक आणि शालेय आणि महाविद्यालयीन क्रीडापटूंना कमी किमतीत साहित्याची खरेदी करता येईल, त्यामुळे 5 टक्क्यांपेक्शा जास्त कर लावू नये, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

या क्रीडा साहित्यांवर लागू होतो जीएसटीचा करा
लांब उडीचे पोल, गोळाफेकीचा गोळा (5 किलो, 7 किलो), बॉक्सिंग ग्लोव्हज्, जिम्नॅस्टिक्सचे साहित्य, स्विमिंग गीअर हे त्या त्या खेळातील खेळाडूंसाठी आवश्यक असलेल्या साहित्यावर 28 टक्के जीएसटी लागू झाला आहे. योगाचे मॅट, जिम मशीन, दोरी उड्या, डंबेल्स, ट्रेडमिल, स्पोर्ट्स शुज सारखे साहित्यही 28 टक्क्यांच्या कक्षेत आहे. एखाद्या संस्थेने गुणवान खेळाडूला हॉकी स्टिक, क्रिकेट बॅट, रॅकेट किंवा फुटबॉल दिल्यास त्यावरही सर्व्हिस टॅक्स लागू होईल. बुद्धिबळाचा पट आणि कॅरम बोर्डवर आता 12 टक्क्यांऐवजी 28 टक्के कर भरावा लागणार आहे.