खेळाच्या नावाने मानवी तस्करी

0

नवी दिल्ली-भारतीय क्रिकेटला हादरा बसेल अशा काही घटना समोर आल्या असून यामध्ये क्रिकेटपटू दाखवून विदेशदौऱ्यावर बोगस लोकांना पाठवण्याचे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. इंडिया टुडेने स्पेशल शोधमोहीम राबविली असून यामध्ये सक्रिय सहभाग असलेल्यांच्या मुलाखती नोंदविल्या केल्या आहेत. माजी रणजीपटूचाही यात समावेश असून 25 ते 30 लाख रुपये भरले की क्रिकेट दौऱ्यांमध्ये कधी खेळाडू, कधी मॅनेजर, कधी सपोर्ट स्टाफ अशा नावाखाली विदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांना धाडण्यात येत असल्याचं या विशेष तपासात आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

जयपूरमध्ये या घोटाळ्याचा केंद्रबिंदू असून रणजी चषकामध्ये राजस्थानचा कप्तान राहिलेल्या व 19 वर्षे प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळलेला मोहम्मद असल्म व त्याचा सहरापी हर्ष कौशिक यांना या संपूर्ण घोटाळ्याची कबुली देताना कॅमेऱ्यात बंद करण्यात आले आहे. क्रिकेट दौऱ्याच्या नावाखाली व्यावसायिक, हौशी श्रीमंत तसेच ज्यांना भारत सोडून दुसऱ्या देशात बोगस नावानं स्थायिक व्हायचंय अशा प्रकारचे लोक क्रिकेट टीमचा भाग म्हणून पाठवण्यात आल्याचे या व्हिडीयोमध्ये समोर आले आहे.

जयपूरमधल्या एका हॉटेलमध्ये अस्लमला पत्रकार भेटले त्यावेळी पैसे दिले की सगळं काही होतं असं सांगण्यात आलं. लवकरच दक्षिण अफ्रिकेचा दौरा असून क्रिकेटच्या टीममधून मानवी तस्करी करायची असेल तर शक्य असल्याचे हर्षनं सांगितलं. तसेच अनेक दौरे यापुढेही घडणार असून त्या दौऱ्यांतही तुमची माणसं पाठवू असं तो म्हणाला.

एका क्रिकेटच्या टीममध्ये 15 जण असतात. परंतु विदेश दौऱ्यामध्ये क्रिकेटची टीम म्हटली की 25 जणांना व्हिसा मिळतो. त्यामुळे मग काही क्रिकेटपटू काही टीम मॅनेजर काही अन्य स्टाफ असं दाखवून जास्त लोकांना विदेशात धाडण्यात येतं. यातले काही जण मौजमजा करून परत येतात, तर काही जण परत येतच नाहीत आणि तिकडेच राहतात असंही सांगण्यात आलं.

विशेष म्हणजे, इंडिया टुडेनं ज्येष्ठ क्रिकेटपटू मदन लाल यांची प्रतिक्रिया घेतली असून मदन लाल यांनी आमच्या काळापासून हा प्रकार घडत असल्याचे सांगितले. पंजाबमधून काही जणांना विदेशात जाण्यासाठी व्हिसा हवा असायचा आणि तो क्रिकेट टीमच्या नावाखाली दिला जायचा, असे ते म्हणाले. तसेच असे प्रकार घडत असल्याची सगळ्यांना कल्पना असली तरी कुणी बोलत नाही असंही लाल पुढे म्हणाले आहेत.