नवी दिल्ली । श्रीलंकेला सर्वच मालिकांमध्ये पूर्णपणे धोबीपछाड केल्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढण्यास सज्ज झाला आहे. परंतु, या सगळ्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआयकडे खेळाडूंसाठी महत्वाची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक तयार करताना खेळाडूंच्या विश्रांतीचाही विचार करावा, अशी मागणी रवी शास्त्री यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासक समिती, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना रवी शास्त्रींनी ही मागणी केल्याचे म्हटले आहे.
सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम होतो, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला. त्यानंतर मार्चमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामन्यांची मालिका झाली. त्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये आयपीएलमध्ये खेळाडू व्यस्त होते. आयपीएलनंतर तातडीने भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना झाला. चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच इंग्लंडहूनच भारतीय संघ वेस्ट इंडिज दौर्यासाठी रवाना झाला. वेस्ट इंडिजमध्ये 5 वन डे आणि एक टी-20 सामना खेळवण्यात आला.
वेस्ट इंडिजहून परतताच भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 5 एकदिवसीय 3 कसोटी सामने आणि एक टी-20 खेळण्यासाठी रवाना झाला. त्यानंतर भारतीय संघ आता मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतरही भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय सामन्यांचं नियोजनपूर्वक वेळापत्रक तयार करावे.