निगडी (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू घडविण्यात शालेय जीवनातील प्राथमिक प्रशिक्षक महत्त्वाचा असतो. त्यांच्यामुळेच खेळाडू स्पर्धेचे विविध स्तर पार करीत राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर चमकू शकतो, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी केले. पिंपरी-चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू, गुणवंत क्रीडा शिक्षक, पत्रकार व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या मनोहर वाढोकर सभागृह पार पडला. यावेळी अंजली भागवत बोलत होत्या.
या वेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू शांताराम जाधव व शकुंतला खटावकर, ऑलिम्पिक मॅरेथॉन धावपटू बाळकृष्ण अकोटकर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे, क्रीडा भारतीचे राज्य कार्यवाह राज चौधरी, निगडी केंद्राचे उपप्रमुख मनोज देवळेकर, शरद इनामदार आदी उपस्थित होते. शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांना जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा शिक्षक सचिन खांदवे, जगदीश सोनवणे, बन्सी आटवे, संपदा कुलकर्णी यांना गुणवंत क्रीडा शिक्षक आणि मिलिंद कांबळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा परिषदेचे गुणंवत क्रीडा शिक्षक राजेंद्र महाजन, शबाना शेख, सुवर्णा घोलप यांचाही गौरव करण्यात आला. त्याचबरोबर विविध शाळा व महाविद्यालयांतील 90 राष्ट्रीय व राज्य खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
शिस्त आणि सराव महत्वाचा
अंजली भागवत म्हणाल्या की, खेळात करिअर करताना आपले ध्येय निश्चित करा. राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, ऑलिम्पिक, विश्व स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय समोर ठेवून शिस्त, सराव आणि जिद्दीने मार्गाक्रमण करा. मात्र, त्यासाठी शालेय वर्गाप्रमाणे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग पार करीत म्हणजे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तर टप्प्या-टप्प्याने स्पर्धा स्तर पार करून खेळाडूंनी पुढे गेले पाहिजे. त्यानुसार प्रशिक्षकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यांच्या शिवाय खेळाडूच कामगिरी करूच शकत नाही.
मोरे, अकोटकर, आटवे यांनी मनोगत व्यक्त केले. कविता आल्हाट व अशोक जाधव यांनी सुत्रसंचालन केले. संघटनेचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. सचिव अंगदराव गरड यांनी आभार मानले.