खोटं बोल पण रेटून बोल

0

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून सत्ताधारी शिवसेनेमध्येच गोंधळ आहे. कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणारे शिवसेनेचे मंत्री तर कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची यादी मागत आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर अनेक वेळा कर्जदार शेतकर्‍यांची यादी जिल्हा बँकेकडून मागवण्यात आली. शेवटची यादी गेल्या आठवडयात मागणवण्यात आली पण कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही. दहा हजार तातडीचे कर्जही शेतकर्‍यांना मिळालेले नाही. एका बाजूला कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्यामुळे झाली, अशी शेखी मिरवायची आणि दुसर्‍या बाजूला बँकासमोर ढोल बजाओ आंदोलन करायचे, अशी डबल ढोलकी शिवसेना वाजवत आहे. कर्जमाफीवरून टीका करायची आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे.

समृद्धी महामार्गावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जाऊन विरोध केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय चावी फिरवली हे त्यांचे त्यांनाच ठावूक? लगेच आठवडभराने या समृद्धी महामार्गाचे चेक वाटप करण्यासाठी सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्वत: उद्धव ठाकरे हजर होते. ठाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि त्यांचे नातेवाईक चेक स्वीकारत आहेत, असा आरोपही ठाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केला आहे. हा शेतकर्‍यांचा विरोध उद्धव ठाकरे यांना दिसत नाही का? विरोधक तर या प्रश्‍नावर या अधिवेशनात आवाज उठवणार आहेत का? ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील उद्धव ठाकरे यांची चेकवाटप समारंभाला उपस्थिती पाहून औरंगाबादचे शेतकरी मुंबईत भेटायला आले. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंनी वल्गना केली की शेतकर्‍यांच्या बागायती जमिनी जाऊ देणार नाही मग शहापूरच्या शेतकर्‍यांच्या जमिनी कशा जाऊ दिल्या? या प्रश्‍नावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या अधिवेशनात काय भूमिका घेतात, याकडे राज्यातील शेतकर्‍यांचे लक्ष आहे.

समृद्धी महामार्गाला उद्धव ठाकरे यांनी संमती दिल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये आहे. दिली असेल तर जाहीर करून टाका? उगाच कशाला शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळत आहात? दुटप्पी धोरण सोडून ठोस भूमिका घेतली तर ठीक आहे अन्यथा शेतकरी तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.

एसआरए घोटाळा अधिवेशनाच्या तोंडावर समोर आला. एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वास पाटील यांनी निवृत्तीच्या दिवशी 450 फाईल्स क्लीअर केल्याचा आरोप झाला आहे. या आरोपाबाबत रान उठले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व फाईल्सना ‘स्टे’ दिला. त्यांनतर एसआरएचे घोटाळे बाहेर पडू लागले.

घाटकोपरमध्ये संदीप येवले या सामाजिक कार्यकर्त्याला लाच देण्याचा प्रकर झाला. यावर बराच गोंधळ झाला. भाजप आमदार राम कदम यांच्यावरही येवले यांनी आरोप केला. यावर राम कदमांचे म्हणणे आहे की, आता मंत्रीमंडळ विस्तार आहे, या विस्तारात आपले नाव होते. त्यामुळे आपल्या विरोधकांचा हा डाव आहे. राम कदम हे मनसेतून भाजपमध्ये गेले आहेत. मूळ भाजपाच्या आमदारांना डावलून राम कदम यांना मंत्रिमंडळात घेणार आहेत का? की हे राम कदमांचे दिवास्वप्न आहे? या मुद्दयावरून सरकारला धारेवर धरण्याची घोषणा विधानपरिषदेतील विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. पाहू या याला घोडा मैदान जवळ आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या मंत्र्यांनी सुरळीत पार पाडले. आता पावसाळी अधिवेशन तर 2-3 आठवडयाचे असेल. राज्यातील विरोधकांमध्ये एकसंघता नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही एकमेकांवर कुरघोडी करण्यातच मानत आहे. त्यामुळे विधिमंडळात विरोधाचे हत्यार बोथट झाले. दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांविरुद्ध ब्र काढत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीही खुशीत असतात. विधानपरिषदेत नारायण राणे हे सरकारचे बाभाडे काढत असत. पण इडीचे भूत त्यांच्या डोक्यावर बसवल्यानंतर ते शांत झाले आहे. आता तर ते भाजप येऊ का? म्हणून भाजपच्या दारावर आहेत. त्यामुळे विधानपरिषदेतही सत्ताधार्‍यांना फारसा विरोध राहिलेला नाही.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 8-10 मते कुणाची फुटली? यावरून एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. भाजपनेही या निवडणुकीत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. आम्ही तुमच्याशिवाय 145ची संख्या गाठली आहे, असे शिवसेनेला दाखवून दिले आहे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची मत फुटली, अशी हवा करून या दोन पक्षांत भांडणे लावली आहेत. यावरून या अधिवेशनात गोंधळ उडणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी असे डावपेच करून विरोधक आपल्याला त्रास देणार नाहीत, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी आणि समृद्घी मार्गबाधित शेतकर्‍यांचे काय होणार? हे काळच सांगू शकेल.