अकोला/अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ‘गावात येऊन खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना कपडे फाडून तुडवून तुडवून मारा. तुम्हीच त्यांना मारलं पाहिजे’, असं वादग्रस्त वक्तव्य शेट्टी यांनी केलं आहे. तर ‘शेट्टींनी सांगितलं तर एखाद्या मंत्र्याला भोसकून यायलाही कमी करणार नाही’, असं धक्कादायक वक्तव्यही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अकोल्यातील निंबा गावात आयोजित एका सभेत राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसमोर हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘ऊठसूठ गावात येऊन भाषण करून खोटी आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना ठोकून काढा. त्यांची कपडे फाडून तुडवून तुडवून मारा. हे माझं स्पष्ट मत आहे. तुमचं मत काय आहे?’, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थितांना केला. ‘या मंत्र्यांना आता मारलं पाहिजे. त्यासाठी मी कोल्हापूरमधून माणसं पाठवेन याची वाट पाहू नका. तुम्हालाच त्यांना मारायचं आहे. सरकार आपलं देणं लागतं. आम्ही बँकेचं देणं देऊ शकत नाही. मग आम्ही मंत्र्यांना ठोकलं तर बिघडलं कुठं?’ असा सवालही शेट्टी यांनी केला.
शेट्टी यांच्यापाठोपाठ त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘यापुढे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करायची गरज नाही. गरज पडल्यास कापूस-सोयाबीनला भाव न देणाऱ्या मंत्र्यांना पेटवा, खासदार-आमदारांना ठोका, पण आत्महत्या करू नका’, असं सांगतानाच ‘शेट्टींनी सांगितलं तर एखाद्या मंत्र्याला भोसकायलाही कमी करणार नाही’, असं वक्तव्य तुपकर यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.