खोटेनगरात अंगणासमोर उभ्या दोन कारच्या काचा फोडल्या

0

जळगाव- शहरातील खोटे नगर परिसरातील निवृत्ती नगरात मध्यरात्री अंगणात घरासमोर उभ्या कारच्या काचा अनोळखी इसमाने फोडल्याची घटना शनिवारी सकाळी 7 वाजता समोर आली आहे. यात कारचे नुकसान झालेले दोन्ही शासकीय कर्मचारी आहे. यात एक जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी तर दुसरी कार पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालय अधीक्षकांची असल्याची माहिती मिळाली आहे.

शहरातील निवृत्ती नगरात गणपती मंदिराजवळ पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक नागेश हडपे हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरासमोर कार पार्किंग करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यालगत दुसर्‍याच्या घरासमोर ते कार उभे करतात. शनिवारी रात्री हडपे यांनी नेहमीप्रमाणे त्यांची कार (क्र एम.एच 19 ए.एक्स 9980) ही नेहमीप्रमाणे त्याच जागेवर उभी केली होती. शेजारील महिला सकाळी अंगण झाडत असताना तिला कारची मागील बाजूची कार फुटलेली दिसून आली आहे. त्यांनी हडपे यांना प्रकार कळविला. त्यांनी पाहणी केली असता दगडाने काच फोडली असल्याचे दिसून आले. काच फोडण्यासाठी मारलेला दगड कारच्या मागच्या सिटावर आढळून आला. हडपे यांनी प्रकाराबाबत तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. यादरम्यान याच परिसरातील आणखी एका जणाच्या कारच्या काचा फोडल्याचे दिसून आले.

जि.प.सेवानिवृत्ताचीही कारची काच फोडली
निवृत्तीनगरातच हडपे यांच्या घरापासून काही अंतरावर जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी तुळशीराम बाजीराव सुर्यवंशी हे कुटुंबासह राहतात. अनेक दिवसांपासून कुठेही बाहेरगावी न गेल्याने त्यांची कार त्यांच्या अंगणात समोरच उभी आहे. शनिवारी सकाळी ते उठल्यानंतर ते कारजवळ आले असता, कुणीतरी त्यांच्या कारच्या समोरील काच फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. समोरील बाजूला काचेला तडा गेला असून नुकसान झाले आहे. याप्रकरणी सुर्यवंशी सायंकाळी तालुका पोलिसात तक्रार दिली आहे.