खोट्या मॅसेजमुळे रेल्वे प्रवाशी संभ्रमावस्थेत

0

 भुसावळ। उधना जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काही वेळा या मार्गावरील प्रवाशी गाड्यांना विलंब झाला आहे. परंतु 25 मे पासून 11 जून पर्यंत या मार्गावरील भुसावळ – सुरत पॅसेंजर व अमरावती – सुरत पॅसेंजर या गाड्या बंद राहणार असल्याचा चुकिचा संदेश व्हायरल झाल्याने प्रवाशी संभ्रमात आहेत. मात्र रेल्वेने या संदेश खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

अफवा पसरविणार्‍यांचा शोध घ्यावा
दरम्यान या मार्गावरील अमळनेर यार्डमध्ये रिमोल्डींग कार्य होत असल्याने 25 मे पासून 11 जुन पर्यंत सूरत – भुसावळ पॅसेंजर गाडी क्रमांक 59013, भुसावळ – सूरत पॅसेंजर, सूरत – अमरावती फास्ट पॅसेंजर क्रमांक 59025, अमरावती – सूरत फास्ट पॅसेंजर क्रमांक 59026 या गाड्या उपरोक्त कालावधी थांबविण्यात आल्या आहेत. तसेच गाडी क्रमांक 59077/59078 सूरत भुसावळ सूरत पॅसेंजर नंदुरबार स्थानकावरच थांबविण्यात येणार आहे. दरम्यान गाडी क्रमांक 5913/14 च्या प्रवाशांसाठी गाडी क्रमांक 12844/43 अहमदाबाद – पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस तसेच या मार्गावरील अन्य गाड्या तसेच गाडी क्रमांक 12834 हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस या गाड्यांना बारडोली व व्यारा स्थानकांवर अतिरिक्त थांबा दिला जात असल्याचे या संदेशात सांगण्यात आले आहे. या संदेशाबद्दल मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, असा कोणाताही संदेश रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेला नाही. तसेच याबाबत त्यांनी सुरत रेल्वे स्थानकाशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणाताही दुजोरा मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. हा संदेश दिवसभर सोशल मिडीयावर व्हारल होत असल्याने या मार्गावरिल प्रवाशी संभ्रमात आहेत. विशेष करुन अप-डाउन करणार्‍यांसमोर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. प्रशासनाने खोटी माहिती पसरविणार्‍यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.