मुंबई । शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या पत्नीचे मतदार यादीत 6 वेळा नाव आहे. यावर आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. खोट्या याद्यांच्या जीवावर शिवसेना पदवीधर निवडणूक जिंकणार आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये अनेकांची नावे नाहीत. तर, अनेकांची नावे अनेकवेळा देण्यात आली आहेत. मालाड विधानसभा मतदार संघात नार्वेकर यांच्या पत्नीचे 6 वेळा नाव कसे आले. याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे राणे यांनी ट्विट केले आहे. मुंबईतल्या मतदार याद्यांची फेरतपासणी करावी, अशी मागणीही राणे यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकांना अजून वर्षाचा कालावधी आहे. तत्पूर्वी या याद्या कराव्यात याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
येत्या 25 तारखेला मुंबई पदवीधर मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत राणे यांच्या स्वाभिमान संघटनेचे राजू बंडगर मैदानात आहेत. शिवसेनेचे विलास पोतनीस ही निवडणूक लढवत आहेत. नारायण राणे हे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून गेले आहेत. मात्र, त्यांचे पुत्र आमदार नितेश यांनी काँग्रेस सोडली नाही. सत्तेत असलेल्या शिवसेनेला कोणत्याही प्रकारे मदत करणार नसल्याची भूमिका या पिता-पुत्रांनी घेतली आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राणे यांच्याकडील मते शिवसेनेचे उमेदवार राजेश राजळे यांना मिळाली नाहीत. पदवीधर मतदार संघातही शिवसेनेचे उमेदवार विलास पोसणार राणे कुटुंबियांच्या निशाण्यावर आहेत. यातूनच मतदार याद्यांच्या घोळावर नितेश राणे यांनी बोट ठेवले असल्याचे चर्चिले जात आहे.