खोडकिडा कीटकाच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंताग्रस्त

0

भात पिकांवर परिणाम होण्याची शक्यता, अवेळी पाऊस, वाढती उष्णता मारक, पिकांची पाने करपली

भात पिकावर तुडतुड्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव

मुरबाड । मुरबाड तालुक्यातील धसई, टोकावडे, म्हसा, शिरोशी, माळ, सरळगाव व मुरबाड परिसरात अचानक होणार्‍या दैनंदिन हवामान बदलाचा येथील भात पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अवेळी पाऊस आणि वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढणारी उष्णता भात शेतीस मारक ठरत आहे. त्यात मानवी आरोग्याप्रमाणे आता शेतकर्‍यांनी शेतात लावलेल्या भात पिकावर गंभीर परिणाम दिसून येत आहे.

एकीकडे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले असतानाच मुरबाड तालुक्यातील भात पिकावर तुडतुड्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या तुडतुड्या व करपा कीटकांच्या अळी भात लोग्याच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. यामुळे भात पिकांची पाने पिवळी पडतात. तर काही ठिकाणी पाने करपून जातात.

उष्णतेचा पिकांवर परिणाम
शेतात सर्वत्र आता भात पिकाच्या लोम्ब्या दिसू लागल्या आहेत. तर पावसाने अचानक दांडी मारल्याने त्याच बरोबर उष्णताही वाढली आहे. या दोन्ही बाबींचा भात पिकावर परिणाम होत असल्याची माहिती मुरबाडमधील शेतकर्‍यांनी दिली. तर काही भागात भाताच्या लोम्ब्या तयार होण्याचा मार्गावर असताना अवेळी पावसामुळे पिकावर खोडकिड्याचा रोग पडून लोम्ब्या काळसर पडत आहेत. मात्र तोंडात आलेला सोन्यासारखा खास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.