ख्रिस्ती धर्मगुरूची इसीसच्या कैदेतून मुक्तता

0

नवी दिल्ली । मूळचे केरळचे असणारे ख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम उझहन्निल यांची अखेर इसीसच्या तावडीतून मुक्तता करण्यात आली आहे. फादर टॉम यांचे 2016 मध्ये येमेनच्या दक्षिणेकडील अदेन शहरातून इसिसने अपहरण केले होते. फादर टॉम यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु होते. जवळपास 18 महिने फादर टॉम इसिसच्या तावडीत होते.

दीड वर्षापूर्वी अपहरण
ख्रिश्चन मिशनरीतर्फे चालवण्यात येणार्‍या वृद्धाश्रमात धर्मगुरु टॉम उझहन्निल कार्यरत होते. मार्च 2016 मध्ये येमेनमधील अदेन शहराच्या दक्षिण भागात आयसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यानंतर दहशतवाद्यांनी टॉम उझहन्निल यांचे अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरु होते. यात येमेनसह सौदी अरेबिया आणि ओमान या देशांची मदत घेतली जात होती. अखेर भारताच्या प्रयत्नांना यश आले असून दीड वर्षाने त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्या सुटकेमध्ये सुल्तान ऑफ ओमानने महत्वाची भूमिका बजावल्याची माहिती आहे.

स्वराज यांनी दिली माहिती
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन धर्मगुरु टॉम उझहन्निल यांच्या सुटकेची माहिती दिली. ‘फादर टॉम यांची सुटका झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे’ अशी माहिती सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन दिली. धर्मगुरु टॉम उझहन्निल यांना मस्कतमध्ये नेण्यात आले असून त्यांना विमानाने भारतात आणले जाईल अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिली. काही महिन्यांपूर्वी फादर टॉम यांचा एक व्हिडीओ येमेनी वेबसाईटने प्रसिद्ध केला होता. यामध्ये फादर टॉम यांची प्रकृती खालावल्याचे दिसत होते. आपल्याला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्याचे ते व्हिडीओ संदेशात म्हणाले होते.