ख्रिस गेल नावाच्या वादळासमोर भारताची परीक्षा

0

किंग्जस्टन ।  पाच सामन्यांची एकदिवसीय क्रिकेटची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्‍वास उंचावलेला आहे. त्यामुळे टी 20 क्रिकेटमधील एक वादळ म्हणून गणल्या जाणार्‍या ख्रिस गेलच्या उपस्थितीतही बाजी मारुन कॅरेबियन बेटांच्या दौर्‍याचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ टी 20 सामन्यासाठी मैदानात उतरेल. विंडींजविरुद्धच्या या टी 20 सामन्यात विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2016 मध्ये भारतात झालेल्या टी 20 विश्‍वचषक स्पर्धेत विंडीजनेच उपांत्य फेरीत भारताला 7 विकेट्सनी हरवले होते. त्यानंतर 2016 मध्ये अमेरिकेत झालेली दोन टी 20 क्रिकेट सामन्यांची मालिका विंडीजने 1-0 अशी जिंकली होती. या दोन्ही पराभवांची परतफेड करण्याची संधी या सामन्याच्या निमित्ताने भारताला मिळाली आहे.

सव्वा वर्षांनंतर गेल संघात
गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या अंतिम सामन्यानंतर ख्रिस गेल सव्वा वर्षाने पुन्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. लेंडल सिमन्सच्या जागेवर गेलचा राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाने या सामन्याकरता कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डरला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी कार्लोस ब्रेथवेट संघाचे नेतृत्व करेल. विंडीजचा एकदिवसीय संघ अनुभवहीन होता. पण या सामन्यात भारताला केवळ गेलचाच नाही तर सॅम्युअल बद्री, सुनील नरेन, एविन लुईस आणि किरॉन पोलार्डच्या आव्हानचा सामना करायचा आहे. एविन लुईसने गेल्यावर्षी फ्लोरिडामध्ये खेळेलेल्या टी 20 सामन्यात भारताविरुद्ध 49 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. टी 20 क्रिकेटच्या प्रारुपामुळे भारतीय संघ आपल्या रणनिती आणि संघात बदल करण्याची शक्यता आहे, कोहलीने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेजंर्स बेंगळुरूसाठी सलामीला फलंदाजी केली होती. याशिवाय रोहित शर्माच्या गैरहजेरीतही तो अनेकदा सलामीला आला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेऐवजी शिखर धवन आणि कोहली डावाची सुरुवात करु शकतात.