ख्वॉजामियाच्या जागेवर होणार हॉकर्स स्थलांतर

0

जळगाव । शहरातील हॉकर्स यांना स्थलांतरीत करण्याची प्रक्रीया महानगर पालिकेडून राबविण्यात येत आहे. यानुसार सिव्हीक सेंटर येथे हॉकर्सचे स्थलांतर नुकतेच करण्यात आलेले आहे. तसेच शहरातील इतर हॉकर्स ज्यात बळीराम पेठ, शिवाजी रोड, सुभाष चौक, भिलपुरा ते टावर चौक येथील भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व इतर हॉकर्संना ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेवर स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी अतिक्रमण विभागाद्वारे बुधवारी तेथे 6 बाय 4 आकारातील जागा आखणीचे काम सुरू झाले आहे.

800 हॉकर्स करतील व्यवसाय
आज कच्ची आखणी ठिपके टाकून करण्यात आली आहे. या जागेवर जवळपास 800 हॉकर्स आपला व्यवसाय करू शकणार आहेत. तसेच या बाजारात येणार्‍या फोरव्हीलर व दुचाकींधारकांना गाडी पार्कींगसाठी स्वंतत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉकर्स स्थलांतराचा प्रश्‍न बिकट झालेला आहे. बळीराम पेठ, शिवाजी रोड येथील हॉकर्सला स्थलांतर करण्याचा प्रयत्न महानगर पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु, काही हॉकर्स न्यायालयात गेल्याने स्थलांतर लांबणीवर पडलेले आहे. यातच प्रशासाने ख्वॉजामिया झोपडपट्टी असलेल्या जागेवर या हॉकर्सचे स्थलांतर करण्याची प्रक्रीया सुरू केलेली आहे. जागेची आखणी केल्यानंतर या हॉकर्सचे सोडत काढून त्यांना जागा देण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.