पाटणा: मुंबईतील कुख्यात गुंड एजाज लकडावाला याला बिहारच्या पाटणा येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल असून, गेल्या अनेक वर्षापासून मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. त्याची २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी दिली.
एजाज लकडावाला या गँगस्टरविरोधात मुंबईत तब्बल २५ गुन्ह्यांची नोंद आहे, तर राज्यभरातही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. लकडावाला याची मुलगी सानिया हिला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ३० डिसेंबर रोजी बनावट पासपोर्टप्रकरणी अटक केली होती. ती मुंबईहून नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. सानियाच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून एजाज याच्या मुसक्या आवळल्या.
खार येथील एका बांधकाम व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी एजाज विरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडून सुरु होता. याप्रकरणात एजाज याचा भाऊ अकील लकडावाला यालाही अटक करण्यात आली होती.