गंगाखेड शुगर्समधील घोटाळेबाजांना सरकारचे संरक्षण- धनंजय मुंडे

0

मुंबई: गंगाखेड शुगर्स या कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाने साडेतीनशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे तपासात निष्पन्न होऊनही राज्य सरकार संबंधितांना अटक करीत नाही. या घोटाळ्यामागे राज्य सरकार आहे, सरकारला घोटाळा दाबायचा आहे का असा सवाल करीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री या घोटाळेबाजांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठीच राज्य सरकार संशयितांची अटक टाळत आहे असल्याचा सनसनाटी आरोपही राष्ट्रवादीचे आमदार सुनिल तटकरे यांनी यावेळी केला.

धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात गेल्या आठवड्यात लक्षवेधी सूचना मांडली होती. मात्र, त्यावेळी मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर न आल्याने ही लक्षवेधी सूचना राखून ठेवण्यात आली होती. मंगळवारी ही सूचना पुन्हा चर्चेला आली होती. यावेळी मुंडे म्हणाले, गंगाखेड शुगर्स या कारखान्याच्या अध्यक्ष आणि संचालकांनी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर बोगस कर्ज काढले आहे. सुमारे पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या नावे बाराशे कोटींचा हा घोटाळा आहे. बारा ते पंधरा जिल्ह्यात या घोटाळ्याची व्याप्ती आहे. सरकारने ३५८ कोटींचा घोटाळा झाल्याचे कबूल केले आहे. तर या घोटाळेबाज कारखानदार, संचालकांवर सरकार काय कारवाई करणार, त्यांना अटक केली जाणार आहे का असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.

त्याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, १२ हजार ९ शेतकऱ्यांची यादी सरकारला प्राप्त झाली आहे. त्यांच्या नावावर ३५८ कोटींचे कर्ज काढले असल्याचे दिसून आले आहे. हा आर्थिक गुन्हा आहे. चौकशीअंती यात जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल. मात्र, विरोधकांनी कारवाईचा आग्रह धरल्याने ते पुढे म्हणाले, आर्थिक गुन्ह्याखाली चौकशीनंतर आमदार रमेश कदम यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांचेही नाव घेतले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य संतप्त झाले. विरोधकांनी केसरकर यांच्या या विधानाला जोरदार आक्षेप घेतला. इतरांचे सांगून पाठ थोपटून घेऊ नका, ज्यावेळी जे व्हायचे ते होईल असे म्हणत सुनिल तटकरे यांनी केसरकर यांच्या वक्तव्याला आक्रमकपणे विरोध दर्शविला. यावेळी सभागृहात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर केसरकर पुढे म्हणाले, आर्थिक गुन्हे दाखल झाल्यानंतर चौकशी होऊन पुढील कारवाई होते. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली याची चौकशी सुरु आहे. एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. संबंधितांची अकरा बँक खाती सील केली आहेत. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करुन कारवाई केली जाईल, कोणालाही पाठिशी घालणार नाही, असे उत्तर केसरकर यांनी दिले. यावेळी केसरकर यांनी काही संशयितांची नावेही सभागृहात वाचून दाखवली. त्यामुळे विरोधक पुन्हा आक्रमक झाले.

पुरावे देऊनही कारवाई होत नाही, अशी भूमिका मुंडे यांनी मांडली. कारखान्याचे १३५ कर्मचारी शेतकऱ्यांना धमकावत आहेत. घोटाळ्यामागे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री संबंधितांना पाठीशी घालत आहे असा आरोपही त्यांनी केला. त्याचवेळी तटकरे यांनी संबंधितांवर मोक्काअंतर्गत कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला. यावेळी चर्चेत भाई जगताप, जोगेंद्र कवाडे आदींनी सहभाग घेतला.

कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एक हजार कोटींचा दावा दाखल करीत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुट्टेविरोधात राष्ट्रवादीचे आमदार जयवंत जाधव यांनी हक्कभंगाची सूचना यावेळी सभागृहात मांडली. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी ही सूचना स्वीकारली.