‘गंगाधर ही शक्तिमान है’ ; शरद पवार , राज ठाकरेंच्या भेटीवर भाजपची खोचक टीका !

0

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या संपूर्ण महराष्ट्रात भाजप विरोधात प्रचार करत आहे. नांदेड आणि काल सोलापुरात झालेली सभा ही वादळीच ठरली. दरम्यान राज ठाकरे यांच्या मागील बोलविता धनी कोणी दुसराच असल्याची टीका वारंवार होत असते. शरद पवार हे राज ठाकरेंना पुढे करून राजकारण करत असल्याचे आरोप होत आहे. दरम्यान काल राज ठाकरे आणि शरद पवार हे सोलापुरात एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. यावरून भाजपने राज ठाकरे व शरद पवारांना लक्ष केले आहे. राज ठाकरे आणि शरद पवार सोलापुरातील हॉटेलबाहेर भेटतानाचे छायाचित्र भाजपने ट्विट करत ‘कर्ता आणि करविता एकत्र येणे स्वाभाविक आहे, कारण ‘गंगाधर ही शक्तिमान है’ हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहे, असा खोचक टोला लगावला आहे.

सोलापूर दौऱ्यात राज ठाकरेंच्या सभेसोबतच बाजूच्या जिल्ह्यात शरद पवारांची सभा होती. त्यामुळे दोघंही सभा आटोपल्यानंतर हॉटेलात परतले. दरम्यान याच हॉटेलात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील होते.

जिथे पवार, तिथे राज
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही राज-पवार भेटीवरून राज यांना टोला लगावला आहे. ‘जिथे शरद पवार असतील, तिथे राज ठाकरे पोहोचतात, मग दोघांमध्ये गुफ्तगू होते आणि भाषणाची स्क्रिप्ट तयार होते’, असे शिक्षणमंत्री तावडे म्हणाले. राज ठाकरे यांनी ते कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत ते एकदा जाहीर करावे, असेही तावडे म्हणाले.