रावेर:- तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील चोरवड, पाडळे बु.॥, पाडळे खु.॥, मंगरूळ गावात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र स्वरूप धारण करत असल्याने ग्रामसभेच्या करण्यात आलेल्या ठराव व पं.स.सदस्य जुम्मा तडवी यांच्या पाठपुराव्यानंतर गंगापुरी धरणाचे पाणी नागोरी नदीत सोडण्यात आले. गंगापूरी धरण परीसरातील पूर्व भागातील पाडळे खुर्द व बु.॥, चोरवड व मंगरूळ या भागातील गावे टंचाई आराखड्यात होती. यावर्षी अल्प पाऊस झाल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती.
गत पंधरवड्यात पाडळे खुर्द व बु.॥ या भागात पाणीपुरवठा करणार्या विहिरींचे पाणी कमी झाल्यामुळे या ठिकाणी विहिर अधिग्रहीत करण्यात आली होती. यानंतर नवीन कुपनलिका खोदण्यात आली. चोरवड येथेही नुकतेच विहिर अधिग्रहण करण्यात आले. या अनुषंगाने भूजल पातळी खोल जात असल्यामुळे पाडळे खुर्द व बु.॥ येथील ग्रामसभेने गंगापूर धरणाचे पाणी नागोरी नदीत सोडण्याचा ठराव केला होता. त्यानुसार तहसीलदार, पंचायत समिती व लघू पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून सोमवारी नागोरी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे या भागातील भूजल पातळीत वाढ होवून टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.