शहादा: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील गंगोत्री फाउंडेशनने आठवड्यात एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. मोहिमेचा शुभारंभ नूतन तहसील कार्यालयाच्या आवारात सुमारे २५० वृक्षांचे रोपण करुन करण्यात आला. यावेळी शहराच्या विविध भागातही वृक्षारोपण करण्यात आले.
येथील नूतन तहसील कार्यालय शहराबाहेरील मोहिदा रस्त्यावर स्थलांतरित आहे. जागा भरपूर आहे.परंतु इमारतीचे बांधकाम नवीनच झाल्याने शिवाय संरक्षण भिंत नसल्याने वृक्ष जगणे कठीण होते. सध्या संरक्षण भिंतीचे ही काम पूर्णत्वास आहे. त्यामुळे येथे गंगोत्री फाउंडेशनने पुढाकार घेऊन पर्यावरणाचे दिनाचे औचित्य साधत वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे २५० वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. तहसील आवारात वृक्ष नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सावलीसाठी कुठेही आडोसा नसल्याने थांबणे जिकिरीचे जाते. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तात्काळ पुढाकार घेऊन अडीचशे वृक्षांचे रोपण करून त्यांना संरक्षण जाळ्यांचीही सोय केली.
या आठवड्यात तब्बल एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प गंगोत्री फाऊंडेशने केलेला असून सर्व वृक्षांची संगोपनाची जबाबदारी घेतली आहे.
याप्रसंगी गंगोत्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अभिजीत पाटील, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, नगरसेवक संदीप पाटील, संजय साठे,संतोष वाल्हे, भरत पाटील,एन.डी. पाटील, अमोल पाटील, कैलास सोनवणे, उमेश पाटील आदींसह तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.