मुंबई । शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या गुणवंत 50 शिक्षकांना मुंबई महापालिकेतर्फे महापौर शिक्षक पुरस्कार काही दिवसांपूर्वीच महापौर विश्वनाथ महाडेश्वर व शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी जाहीर केले होते. मात्र, यांपैकी दोन शिक्षकांवर गंभीर आरोप असल्याचा आक्षेप घेत महापालिका माध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सेनेतर्फे गोविंद ढवळे आणि काही पालक, विद्यार्थी यांनी महापौर व शिक्षण समिती अध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली. महापौरांनी त्याची गंभीर दखल घेऊन तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता 8 फेब्रुवारी रोजी पुरस्कार सोहळा होणार असल्याने या दोन शिक्षकांचे पुरस्कार अडचणीत आल्याचे दिसते.
पुरस्कारासाठी शिक्षकांची यादी वादात
वास्तविक, महापौर पुरस्कार गुणवंत शिक्षकांना जाहीर होण्यापूर्वीच आपल्या शिक्षक-शिक्षकेतर सेनेतर्फे शिक्षण समिती अध्यक्ष, पालिकेचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार करण्यात आली होती. मात्र, शिक्षण विभागातील अधिकार्यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले तसेच ज्या 50 शिक्षकांची यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये वादग्रस्त शिक्षक सुभाष वाघमारे हे त्यांच्या 22 बर्वेनगर शाळेत (घाटकोपर) कधीही वेळेवर उपस्थित राहत नसत, बोगस बिलांचा वापर केला, विद्यार्थ्याना गणवेश दिले नाहीत, मुख्याध्यापकांचे ते नियमबाह्य पीए होते त्यांच्याविरोधात एवढे आरोप असतानाही व ते एका प्रकरणात दोषी आढळले, तरी त्यांची निवड महापौर पुरस्कारासाठी कशी काय करण्यात आली, असा सवाल गोविंद ढवळे यांनी विचारला आहे.
पुरस्काराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
महापौर पुरस्कार हे गुणवंत शिक्षकांनाच दिले पाहिजेत, आरोप असणार्यांना नाही. त्यामुळे महापौर पुरस्कार विकले जातात का, असा सवालही गोविंद ढवळे यांनी, शिक्षण समिती अध्यक्षा व शिक्षण समिती अध्यक्ष यांना विचारला आहे तसेच या दोन शिक्षकांना पुरस्कार न देता ते रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वीही, 2009 साली अशाच प्रकारे एका शिक्षकाला जाहीर झालेला पुरस्कार आरोप झाल्यानंतर व चौकशीअंती रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी माहितीही गोविंद ढवळे यांनी दिली आहे.