गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक

0

देहुरोड : खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 2 पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी देहूरोड येथील मामुर्डी येथे केली. राहुल उर्फ पापा भोसले (वय 30), सॅमसन उर्फ छोटू अँथोनी पॉल झेवियर (वय 26, दोघे रा. साईनगर, मामुर्डी, देहूरोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी मामुर्डी येथील साईनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साईनगरमधील तरस यांच्या वाड्यासमोर सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याविषयी माहिती विचारली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना गुन्हे शाखा युनिट 2 येथे आणून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यानुसार त्यांना अटक करून पुढील कारवाईसाठी तळेगाव पोलिसांकडे देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी भिवसेन सांडभोर, संपत निकम, धर्मराज आवटे, प्रवीण दळे, फारूक मुल्ला, लक्ष्मण आढारी, जमीर तांबोळी, मयूर वाडकर, नितीन बहिरट यांच्या पथकाने केली.