पिंपरी-चिंचवड-गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने गगनगिरी विश्व फाउंडेशनतर्फे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. आज वाल्हेकरवाडी येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन संगीता कवडे यांनी केले होते. गृहिणी म्हणून आपल्या घरातच असलेल्या महिलांमध्ये कलागुण दडलेले असतात, त्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरला आहे. तसेच नदी प्रदूषण टाळण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार आहे.
हे देखील वाचा
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती घेण्याऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्ती घेऊन त्याची सजावट चांगली करता येते. त्याचा आनंद वेगळाच असतो असे अध्यक्षा रेखाताई भोळे यांनी सांगितले. आजपर्यंत महिला केवळ कणिक मळत होते, पण मातीच्या गोळ्यापासून सुबक मूर्ती देखील महिला बनवू शकतात हे या कार्यशाळेतून दिसून आले असे महासंघाच्या अध्यक्षा ज्योतीताई ढाके यांनी सांगितले.
अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक विभागाने घ्यावे जेणेकरून महिलांमध्ये कौशल्य निर्माण होईल व त्यातून महिला सक्षमीकरण होईल असे नगरसेविका संगीताताई भोंडवे यांनी सांगितले. यावेळी गगनगिरी विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखाताई भोळे, संगीता कवडे, विद्या महाजन, स्मिता दुसाने, अनिता सोनवणे, पद्मावती कवडे आदींसह ५८ महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. मूर्ती प्रशिक्षक सविता महाजन, विभावरी इंगळे, गौरी सरोदे, शीतल नारखेडे आदींनी जबाबदारी पार पाडली.