चिंचवड- ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर’, अशा साध्या सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सहजतेने मांडणार्या खान्देशातील निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची 138 वी जयंती पार पडली. पिंपरी-चिंचवडमध्ये ही जयंती वाल्हेकरवाडी परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. खान्देशी बोलीतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान कवयित्री बहिणाबाई यांनी सांगितले असल्याची माहिती, यावेळी गगनगिरी विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा भोळे यांनी दिली. बहिणाबाई यांनी गोड ग्रामीण लेवागणबोलीतून जीवनाचे सार सांगितले असल्याचे भोळे यांनी सांगितले.

हे देखील वाचा
शाडू माती मुर्ती प्रशिक्षण कार्यशाळा
या कार्यक्रमासाठी लेखिका लता चौधरी उपस्थित होत्या. त्यांनी अनेक पुस्तकांचे लिखाण केले आहे. परदेशातही त्यांनी पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. त्यामुळे त्यांना लंडनला शिष्यवृत्ती देखील मिळालेली आहे. बहिणाबाई यांच्यातील एक टक्का गुण जरी माझ्या अंगी आले तरी मी स्वतःला धन्य मानेन अशी भावना लता चौधरी यांनी व्यक्त केली. दरम्यान गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने गगनगिरी विश्व फाउंडेशनतर्फे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. गृहिणींमधील कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम अतिशय उपयोगी ठरला आहे. पर्यावरणाचा र्हास होत असल्याने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात येत आहे. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी गगनगिरी फाउंडेशनतर्फे शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाला विभावरी इंगळे, चारुलता चौधरी, शितल नारखेडे, योगिता नारखेडे, सुरेखा सोनवणे, भानूशाली पाटील, आशा पाटील, अनिता सोनवणे, प्रणाली चौधरी, विद्या महाजन आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन रोहिणी महाजन यांनी केले.