गजेंद्र चौहान यांना मुदतवाढ मिळणार?

0

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या अध्यक्षपदाची अभिनेता गजेंद्र चौहान मुदत शुक्रवारी संपुष्टात येणार असून, त्यांना मुदतवाढ मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एफटीआयआय मंडळावरील नियुक्त्या या तीन वर्षांसाठी असतात. जून 2015 मध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने (4 मार्च 2014) पासून पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे आता या मंडळाची मुदत संपुष्टात येत असून, केंद्र सरकारने एफटीआयआयच्या कार्यकारिणीला मुदतवाढ न दिल्यास गजेंद्र चौहान यांच्यासोबत उपाध्यक्ष बी. पी. सिंग आणि सदस्य असलेल्या अनघा घैसास, शैलेश गुप्ता, नरेंद्र पाठक आणि राहुल सोलापूरकर यांना पद सोडावे लागणार आहे.

‘एफटीआयआय’च्या नवीन सोसायटीची कधी स्थापन करणार किंवा विद्यमान सोसायटीला मुदतवाढ मिळणार का, यासंबंधीचा एफटीआयआय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील संभाषणाचा तपशील उघड करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ‘एफटीआयआय’च्या प्रशासनाने हा मुद्दा प्रलंबित आहे, असे कारण देत माहिती देण्यास नकार दिला होता.

मुंबईत आज बैठक
‘एफटीआयआय’च्या प्रशासकीय मंडळाची बैठक शुक्रवारी मुंबईत होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजवर्धन राठोड तिला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यात विद्यमान सदस्यांना मुदतवाढ देण्यबाबत चर्चा होऊ शकेल, असे सूत्रांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.

केंद्राचा निर्णय स्वीकारू
पूर्वलक्षी प्रभावाने नियुक्ती केली जाऊ नये. तसेच, अशी नियुक्ती केली गेल्यास विद्यमान सदस्यांना मुदतवाढ दिली जावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. मात्र, त्यावर त्यावेळी कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता. आता सरकार जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. मुदतवाढ न दिल्यास आम्ही आनंदाने पद सोडू, असे या मंडळातील एका सदस्याने जनशक्तिशी बोलताना सांगितले.

विद्यार्थ्यांचा होता विरोध
गजेंद्र चौहान यांची 9 जून 2015 रोजी एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर संस्थेतील विद्यार्थ्यांनी या नियुक्तीविरुद्ध आंदोलन छेडले होते. 138 दिवसांच्या संपानंतर विद्यार्थ्यांनी माघार घेतली होती. विद्यार्थ्यांच्या उपोषण सत्रानंतर मंत्रालयाबरोबर झालेल्या बैठकांमध्येही संपाचा मूळ मुद्दा सोडून संस्थेतील पायाभूत सुविधांविषयीचे दुसरेच विषय चर्चेत राहिले.