गझलसाठी तंत्र व मंत्र दोन्ही अत्यावश्यक : डॉ. गायकवाड

0

रंगत-संगत प्रतिष्ठानने आयोजित ‘तंत्रापलीकडील गझल’ कार्यशाळा

पुणे । सकस गझल लेखनासाठी गझलतंत्र व गझलमंत्र ह्या दोन्हींची पुरेशी जाण असणे अत्यावश्यक असते. निव्वळ मंत्र अवगत झाल्याने गझल रचता येत नाही व निव्वळ तंत्रानुसार गझलेच्या आत्म्याला स्पर्श करता येत नाही. इतर साहित्यकृतींच्या तुलनेत कार्यशाळा हा भाग उत्तम गझल लेखनासाठी गरजेचा आहे, असे मत गझल अभ्यासक डॉ. कैलास गायकवाड यांनी केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या गझल कार्यशाळेतील ‘तंत्रापलीकडील गझल’ या परिसंवादात डॉ. गायकवाड बोलत होते.

आत्मकेंद्रीत रूप बदलले
भूषण कटककर म्हणाले, महाराष्ट्रात गझल फोफावत असून तिचे पूर्वीचे आत्मकेंद्रीत रुपडे सुखकारकरित्या बदलेले आहे. ह्या परिवर्तनासाठी गझल कार्यशाळा मोलाची कामगिरी करत आहे. रंगतसंगतने गझलेच्या प्रसारासाठी सुरू केलेले हे कार्य पुढे नेल्यास उत्तम गझलकारांची फळी तयार होईल. अनेक गझलेतर कवी शिस्तबद्ध गझललेखनाकडे आकृष्ट झालेले असून त्यांची वाटचाल आश्‍वासक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

गझलचा सर्वांगीण कार्यानुभव
अ‍ॅड. आडकर म्हणाले, गझल या काव्यप्रकाराचा सर्वांगीण कार्यानुभव देणारे प्रथितयश गझलकार रंगत-संगतकडून ज्या अपेक्षा ठेवतात त्या पूर्ण करण्यात प्रतिष्ठान पूर्ण यशस्वी ठरलेले आहे, हे सहज समजते. या कार्यशाळेत पंढरपूर, लातूर, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे, पिंपरी अशा विविध ठिकाणांहून आलेले गझलकार सहभागी झाले होते. प्रभा सोनवणे यांनी आभार मानले.