कोल्हापूर । गेल्या निवडणुकीत शिवसेनेने कॉग्रेस व डाव्या चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या कोल्हापूरात चांगली बाजी मारून आपली छाप पाडली. कोल्हापुरात 10 पैकी 6 आमदार सेनेचे विजयी झाले आहे.या विजयानंतर याठिकाणी सेनेची ताकद न वाढता गटबाजीची ताकद वाढली आहे.याच गटबाजीच्या राजकारणातुन शिवसेनेच्या पदाधिकार्याच्या कार्यालयावर हल्ला झाला,याची वार्ता वरिष्ठांच्या कानावर गेल्यावरही याची दखल घेण्यात आली नाही. सेनेचे नेते पक्षहितापेक्षा स्वहित व स्व-अस्तित्व जपण्यात जास्त रस असल्याचे या ताज्या प्रकाराने स्पष्ट झाले आहे. या गटबाजीला शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ आहे, अशी कुजबूज ऐकू येते. वाढत्या गटबाजीमुळे शिवसेनेची राजकीय प्रगती होण्यापेक्षा अधोगती होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.आगामी निवडणुकात सेनेला राजकीय फटका बसण्याबरोबरच काही आमदार ऐनवेळी पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजप मध्ये प्रवेश करण्याचे संकेतही मिळत आहेत.शिवसेनेच्या तीन आमदारांची भाजपमधील तिकीटे पक्की झाल्याचे भाजपाच्या गटाकडून समजते. हे खरे आहे की खोटे हे कालांतराने स्पष्ट होईल. पण त्यामुळे सेनेत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुन्या गटबाजीचे लोण कायम
सेनेचे शहरप्रमुख दुग्रेश लिग्रस यांच्या राजारामपुरीतील कार्यालयावर हल्ला झाला तो आमदार राजेश क्षीरसागर याच्या इशार्यावरून हल्ला झाल्याचा लिंग्रस यांनी आरोप केला आहे. यातून सेनेत गटबाजी उघड झाली आहे.लिंग्रस यांनी केलेला आरोप क्षीरसागर समर्थकांनी खोडून काढला असून, याउलट लिंग्रसची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. सेनेतील जुने गटबाजी लोण आजही कायम आहे.सेनेचा गड असलेल्या मातोश्रीवर कोल्हापुरचे खुप महत्व आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापुरातूनच नव्या कार्याचा, मोहिमेचा आरंभ करीत असत.बाळासाहेबांच्या निधनानंतर उध्दव ठाकरे यांनी सुध्दा पहिला दौरा कोल्हापुरातच केला, तेव्हा त्यांनी शिवसनिकांना आधार देतांना ‘रडायचं नाही, लढायचे’ असा संदेश दिला होता.पण जुना गटबाजीचा संघर्ष 1986 पासून आजही सुरू आहे.दोनदा आमदार झालेले सुरेश साळोखे व जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांच्यातील वाद एकमेकांवर गोळ्या झाडण्यापर्यंत गेला होता.
नेत्यांच्या समर्थनाने दुफळी
पक्षबांधणी भक्कम करण्याचा विचार सोडून नेते गटबाजीला उत्तेजन देतांना गावोगावच्या शिवसनिकांचे पद्धतशीर खच्चीकरणही करतात. संपर्कप्रमुख दिवाकर रावते व नेते अरुण दुधवाडकर हे क्षीरसागर यांना पाठीशी घालत आपल्याला अवमानास्पद वागणूक देतात, असे सांगत संजय पवार यांनी या दोघा नेत्यांना कडवे आव्हानच दिले. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारयांचा उघडपणे पाणउताराही त्यांच्याकडून होत असतो. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या इचलकरंजीतील कांही पदाधिकार्यांनी नेतृत्वाशी दोन हात केले होते.