भुसावळ पंचायत समितीचा भोंगळ कारभार ; जि.प.सदस्य संतप्त
भुसावळ- पंचायत समितीतील भोंगळ कारभाराचा पाढा तालुक्यातील सरपंचांनी वाचत जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सावकारे यांनी पुण्याहून भुसावळला येत असताना पंचायत समिती गाठत गटविकास अधिकारी विलास भाटकर यांची चांगलीच कानउघाडणी केली. पंचायत समितीत झालेला कामाची एम.बी. पैसे घेतल्याशिवाय नोंद होत नाही, इस्टिमेट लवकर करत नाही, गोठे मंजूर असून ते वाटप होत नाही, शौचालयाचे अनुदान आतापर्यंत मिळालेले नाहीत, कुठलेही काम पैसे देऊन सुध्दा वेळेवर होत नाही शिवाय पंचायत समितीत कर्मचारी हजर नसतात याबाबत सरपंचांनी तक्रारी केल्या. जि.प.सदस्य सावकारे यांनी याबाबत गटविकास अधिकारी व कर्मचार्यांना जाब विचारत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. यानंतर कामकाजात सुधारणा न झाल्यास गाठ आपल्याशी असल्याची तंबी त्यांनी अधिकारी, कर्मचार्यांना दिली. सावकारे यांच्या रूद्रावताने कर्मचार्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.