चाळीसगाव । शहरातील काही नामांकित प्राथमिक व माध्यमिक संस्था चालकांनी त्यांच्या संस्थेतील शिक्षकांना खाजगी शिकवणी वर्ग घेता यावे म्हणून इयत्ता 1 ली ते 4 थी च्या वर्गाची शाळेची वेळ बदलली आहे. सकाळी भरणारी शाळा ही दुपारची केली आहे. यामुळे लहान मुलांना त्रास होत असून त्या वेळा सकाळच्या सत्रात पूर्ववत कराव्यात आणि खाजगी शिकवणी चालकांना अभय देणार्या गटशिक्षण अधिकार्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दुपारच्या सत्रातील उन्हामुळे काही वेळा विद्यार्थी चक्कर येऊन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. शाळेत जाण्यासाठी मुले कंटाळा करतात अशा अनेक तक्रारी मुख्याध्यापक व संस्था चालकांना पालकांनी दिले असून त्याला न जुमानता लहान मुलांची सकाळची शाळा दुपारच्या सत्रात भरवण्याचा घाट घातला जात आहे. या शाळा शासकीय नियमानुसार सकाळी भरवल्या जाव्यात त्याच प्रमाणे खाजगी शिकवण्या बाबत संभाजी सेनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने तक्रारी देऊन आंदोलने केली आहे. निवेदनावर गिरीश पाटील, सुरेंद्र महाजन, अविनाश काकडे, विजय गवळी, विजय देशमुख, सुरेश पाटील, दिवाकर महाले, प्रवीण पाटील, रवींद्र शिनकर ज्ञानेश्वर पगारे, बापू कुमावत, आधार महाले, संदीप जाधव आदींच्या स्वाक्षर्या आहेत.