गटशेतीतून शेतकर्‍यांचे सबलीकरण होणार

0

जळगाव । जिल्ह्यातील पीक पध्दती आणि विपणन व्यवस्था लक्षात घेता गट शेतीला मोठया प्रमाणात संधी आहे. या संधीचा फायदा शेतकर्‍यांनी घेऊन गट शेतीस प्रोत्साहन द्यावे. जेणेकरुन शेतकर्‍यांच्या सबलीकरणास चालना मिळेल. असा आशावाद जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात गट शेतीला प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकर्‍यांच्या गटशेतीला चालना मिळावी. यासाठी जिल्हयातील विविध शेतकरी समुह गटांकडून गटशेतीसाठी प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांचे सादरीकरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या समोर करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, लिड बँकेचे समन्वयक श्री. दामले, आत्माचे के. डी. महाजन, उपविभागीय कृषि अधिकारी नारायण देशमुख यांचेसह जिल्ह्यातील विविध समुह शेती गटांचे प्रमूख उपस्थित होते.

प्रत्येक शेतकरी गटास मिळणार 1 कोटीचे अनुदान
सन 2022 पर्यत राज्यातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र शासनाच्या दृष्टीकोनास अनुसरुन पुरक उत्पादन वाढविण्यासाठी निविष्ठा, प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, कृषि माल प्रक्रिया व पणन इ. बाबी महत्वाच्या आहेत. राज्यातील शेतक-यांची जमिन धारणा कमी असल्याने शेतक-यांच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी सामुहीक शेती, शेती करण्याची आधुनिक पध्दती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शेतकरी गटांमार्फत, उत्पादक कंपनीमार्फत गट शेतीस प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यासाठी एकाच शिवारातील भौगोलिक क्षेत्रामध्ये संलग्न शेती असणार्‍या किमान 20 शेतकर्‍यांचा व 100 एकर क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांचा समुह एकत्र येवून नियोजनबध्दरित्या शेती करणे, शेतीमालावर प्रक्रिया व मुल्यवर्धन करणे, एकत्रित विपणन करणे व त्यासाठी सामाईक व्यवस्था निर्माण करणे तसेच एकत्रितपणे शेती करण्यासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे व यांत्रिकीकरणाद्वारे एकत्रित शेती करणे हे गट शेतीमध्ये अपेक्षित आहे. यासाठी शासनातर्फे एका गट समुहाला एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.

जिल्हयातून एकूण 21 प्रस्ताव प्राप्त
जिल्हयात सन 2017-18 मध्ये सहा गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्हयातून एकूण 21 प्रस्ताव प्राप्त झाले होते. या समूह गटांनी गट शेतीच्या माध्यमातून करण्यात येणार असलेल्या प्रकल्पांच्या माहितीचे सादरीकरण समितीसमोर करणे आवश्यक होते. तथापि, आज जिल्ह्यातील वैष्णवी शेतकरी गट, लोणपिराचे, बोरणार, कनाशी ता. भडगाव, श्रीकृष्ण शेती गट, नेरी, खजोळा, भडाळी, ता. पाचोरा, बळीराजा कृषि विज्ञान मंडळ, विवरे, ता. रावेर, आमची माती आमची माणस, उत्राण, ता एरंडोल, आदर्श शेतकरी कृषि विज्ञान मंडळ, सतखेडा, ता. धरणगाव, श्री. गुरुदेव दत्त कृषि समुह गट, डोगर कठोरे, ता. यावल, सातपुडा कृषि विज्ञान मंडळ, वाघोड, ता. रावेर या सात गटांनी आपले सादरीकरण सादर केले.