गटारांवर संरक्षक जाळ्या बसवाव्यात

0

पर्यावरण समितीची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या ग्रेडसेपरेटमधील रस्त्याच्या बाजूचे गटार अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्यावतीने या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अभियंत्याने ही गोष्ट दुर्लक्ष केली आहे. त्यामुळे संबंधित अभियंत्यास ह्या चुकीसाठी त्वरित निलंबित करून इतरांसाठी एक आदर्श घालून द्यावा. तसेव कृपया तातडीने त्या उघड्या पावसाळी गटारावर मजबूत जाळ्या बसवून चालकांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समितीच्यावतीने विकास पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

उघडे गटर धोकादायक
विकास पाटील पुढे म्हणाले की, शहराच्या गतिमान विकासात महापालिका अतिशय वेगवान पद्धतीने शहरात अनेक प्रकल्प राबवीत आहे. मात्र ज्या वाहन चालकांसाठी प्रशस्त रस्ते व पूल बांधण्यात येत आहेत, त्यामध्ये चालकांची सुरक्षा आहे असे दिसत नाही. वेग मर्यादा 40 किलोमीटर एवढी दिली असल्याने धोका आणखीन वाढला आहे. कारण दोन-चाकी वाहने शहरात या वेगानेच सर्रास चालत असतात. रस्त्याच्या कडेला दोन ते तीन फुट खोलीचे पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी खोदलेले गटार हे धोकादायक आहेत. त्याशेजारी लावलेल्या सुरक्षा दगडांची उंची फार कमी आहे. एखादे वाहन पंचर झाले अथवा चालकाच्या हातून वाहन जर थोडे बाजूला आले तर ते वाहन थेट गटारात पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.