मुंबई । गटारातील पाण्याने खासगी वाहने तसेच पोलिसांच्या गाड्या धुतल्या जात असतानाचा व्हायरल व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ माटुंगा रोड स्टेशनजवळील सेनापती बापट मार्गावरील आहे. माजी महापौर आणि शिवसेना नगरसेवक तथा जी/उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष मिलिंद वैद्य यांनी गटारातील पाण्याने गाड्या धुतल्याने पसरणारी अस्वछता आणि गाडी धुणार्यांना असलेली पोलिसांची साथ या व्हिडिओद्वारे उघड केली आहे.
सेनापती बापट मार्गावर हनुमान मंदिर आणि बिग बाजार समोर जलवाहिनीतील व्हॉल्वमधून निघणारे पाणी गटारात जमा होते. या साचलेल्या पाण्याने याठिकाणी टॅक्सी, खासगी वाहने धुतली जातात. त्यासाठी सेनापती बापट मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. परिणामी वाहतूककोंडी निर्माण होते. या पाण्याने रस्त्यावरही अस्वछता निर्माण होते. याबाबत रहिवाशांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची पाहणी करण्यास गेलेले नगरसेवक मिलिंद वैद्य यांना तिथे पोलिसांच्या गाड्या धुतल्या जात असल्याचे आढळून आले. या प्रकाराचा व्हिडिओ काढून त्यांनी पोलिसांनाच जाब विचारत गाडी धुणार्यालाही एक लगावली.
कारवाईची केली मागणी
दरम्यान, मिलिंद वैद्य यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे माटुंगा रोड रेल्वेस्थानकाबाहेर सेनापती बापट मार्गावर गाड्या धुणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्याही गाड्या तिथे धुतल्या जात असल्याने त्यांच्या संरक्षणातच हा धंदा सुरू असल्याचे दिसत आहे. रस्त्यावर गाड्या धुण्यास बंदी असतानाही महापालिकेचे क्लीन अप मार्शल वा इतर अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही, याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
पोलीस कर्मचारी शांत
कुंपणच शेत खायला लागल्यावर आम्ही कुणाकडे दाद मागायची? असा सवाल करत वैद्य यांनी गाडी धुणार्याला मारल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करा, असेही पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसते. मात्र, या संपूर्ण व्हिडिओत पोलीस कर्मचारी शांत असून केवळ त्यांची चूक असल्याने त्यांच्याकडून हे प्रकरण नरमाईने घेण्याचे आवाहन वैद्य यांना केले जात होते.