गटार बांधकामांच्या अपूर्णतेचा नागरीकांना त्रास

0

ऐरोली : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयाच्या माध्यमातून रबाळे रेल्वे स्थानक ते गोठिवली गावापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येत असले तरी या कामात दोन्ही बाजूच्या गटारांचे बांधकाम पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिकांना व वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार आणि मनपा अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. पालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आमची घरे पाडली परंतु आज 6 महिने होत आले तरी रस्त्याचे रुंदीकरण होईना, शिवाय ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने अर्धवट बांधलेल्या गटारांची सळ्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी व्यक्त केली.

रबाले रेल्वे स्थानक ते रबाळे गवळी हॉस्पिटल दरम्यान असणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यअ खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असते, या वाहतूक कोंडीवर पर्यायी मार्ग म्हणून गोठिवली गावच्या रस्त्याचा वापर करतात, परंतु पालिकेच्या रेंगाळालेल्या कामांमुळे इकडे पण वाहतूक कोंडीचा त्रास आम्हाला सहन करावा लागत असून पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
– यशवंत पाटील, स्थानिक नागरिक

गोठिवली गावातील रस्त्याचे रुंदीकरण व गटार बांधकामाचा ठेका झुरानी इंटरप्रायझेस या प्रायव्हेट कंपनीला देण्यात आला असून डिसेंम्बर च्या अखेरीस कामाची सुरुवात झाली ,परंतु काही तांत्रिक अडडचणींमुळे गटारांचे बांधकाम थांबले असून येत्या काही दिवसातच ते पूर्ण करण्यात येईल.
– शरद काळे, बांधकाम अभियंता,घणसोली विभाग कार्यालय