नागपूर। कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. कर्जमाफीची गरज नसून शेतकर्यांच्या विकासासाठी तसेच आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असल्याचे गडकरींनी म्हटले आहे. विरोधक फक्त कर्जमाफीची मागणी करतात, आम्हीदेखील विरोधात असताना हीच मागणी करायचो अशी कबुलीही गडकरी यांनी यावेळी दिली आहे. गडकरी यांनी नागपूरमध्ये त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांना आमंत्रित केले होते. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना, विरोधक कर्जमाफीची मागणी करत असताना तुमची भूमिका काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर गडकरी यांनी उपरोक्त उत्तर दिले. त्यांच्या या भूमिकेने गडकरी व भाजप सरकार हे कर्जमाफीच्या विरोधात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीवरून राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली होती. खासदार राजू शेट्टी यांनीदेखील कर्जमाफीसाठी आत्मक्लेश यात्रा काढली. उद्योजकांना कर्जमाफ करणारे भाजप सरकार शेतकर्यांना कर्जमाफ का करत नाही असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला होता. विरोधकांकडून दबाव वाढत असतानाच शेतकर्यांनीही संपावर जाण्याचा पवित्रा घेतला होता. राज्यातील शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याच्या योजनेची घोषणा लवकरच केली जाणार आहे. तसे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमधील शेतकर्यांना दिले होते. 31 लाख शेतकर्यांचे सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे घाईघाईने काही घोषणा न करता, कर्जमुक्तीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी हे विधान केले आहे.