मुंबई | केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी जालना जिल्ह्यात ज्या बुलडोझरवर मांड ठोकलीय, ते मुंबईतील रस्त्यांची चाळण करून ठेवलेल्या ठेकेदारांना चिरडायला आणायला हवे. जालन्यातील वाटूर येथे शेगाव-पंढरपूर दिंडी आणि वाटूर फाटा ते परभणी या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचे उद्घाटन करताना गडकरी म्हणाले होते, की रस्ता चांगला केला नाही तर कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली घालीन! दरवर्षी मुंबई महापालिकेच्या रस्तादुरुस्तीचे तीन हजार कोटी खड्ड्यात घालविणाऱ्या सर्वच ठेकेदारांना गडकरीसाहेबांच्या या बुलडोझरखाली घालून चिरडावे, अशी तमाम मुंबईकरांची इच्छा आहे.
महापालिकेचा झोल
तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना 30 सप्टेंबर 2015 रोजी पत्र लिहून रस्ते घोटाळाप्रकरणी चौकशी करण्यास सांगितले होते. यात चौकशी केलेल्या रस्त्यांच्या कंत्राटांची किंमत ३५० कोटी रुपये होती. मात्र पालिकेने पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत फक्त १४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे लिहिले. रस्ते कामातील वास्तविक त्रुटींसाठी ही रक्कम ठरवण्यात आल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तरी प्रत्यक्षात ३५० कोटी रुपयांचे रस्ते त्यात वाहून गेले. या घोटाळ्यात कंत्राटदारांसोबत दोन थर्ड पार्टी ऑडिटरविरोधातही तक्रार करण्यात आली. काही ठेकेदार काळ्या यादीत टाकले गेले. इंजिनिअर, ठेकेदार, ऑडिटर हे सर्वच पालिकेच्या मेहरबानीने दंड भरून जामिनावर सुटले. काही काळ्या यादीतील मंडळी पुन्हा आडवळणाने नव्या कंत्राटात लूटमार करायला सज्ज झाली. मुंबईकरांच्या नशिबातले खड्डे आणि धक्के काही चुकले नाहीत. यावर्षी आतापर्यंत खड्ड्यातील रस्त्यांनी किमान दोन डझन तरी बळी घेतले आहेत ज्यांच्या मृत्यूनोंदी फिरविल्या गेल्या. त्यामुळे गडकरीसाहेब तुम्ही याच मुंबईत… इथे या आणि हे भ्रष्ट मारवाडी ठेकेदार चिरडून टाका… त्याचबरोबर त्यांच्याशी साटेलोटे करणाऱ्या भ्रष्ट राजकारण्यांनाही चिरडा … मुंबई महापालिकेच्या कारभाराचा बट्ट्याबोळ करणाऱ्यांनाही चिरडा … तुमचा बुलडोझर मुंबईत घुसवाच… मुंबईकरांना गडकरी स्टाईल, उड्डाणपुलांसारखे चांगले गुळगुळीत रस्ते द्या … येताय ना गडकरीसाहेब? आम्ही मुंबईकर वाट पाहतोय तुमची; तुमच्या बुलडोझरसह!
25 – टक्के विकासप्रकल्पांवरील खर्चापैकी दरवर्षी रस्तादुरुस्तीवर
3000 – कोटी दरवर्षी मुंबई महापालिका करते रस्ता दुरुस्तीवर खर्च
7500 – रुपये प्रती स्क्वेअर मीटर खड्डा दुरुस्तीवर केला जातो खर्च