गडकोट किल्ले भाड्याने देवू नका; राजकीय पक्षांकडून संताप

0

किल्ल्यांचे पावित्र्य राखून नियोजनबद्द पध्दतीने त्यांचे संवर्धन करुन महाराजांच्या शूर कर्तबगारीचा अमुल्य ठेवा

गडकोट किल्ले भाड्याने दिले तर मंत्र्यांना फिरु देणार नाही – सचिन साठे

पिंपरी : महाराष्ट्रातील गडकोट किल्ले हेरीटेज हॉटेल्स व लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असून सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा सरकारच्या मंत्र्यांना पिंपरी चिंचवड शहरात फिरु देणार नाही. असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी दिला. भाजपा सेनेने मागील पाच वर्षांत घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देश आर्थिक संकटात सापडला आहे. याची परिणिती म्हणून मागील दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने लाल किल्ला भांडवलदारांच्या घशात घातला. त्याच मार्गाने महाराष्ट्रातील फडणवीस सरकार आता, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि हजारों मावळ्यांच्या प्राणांची आहुती देऊन राखलेले पंचवीस गडकोट किल्ले भांडवलदारांना दिर्घ मुदतीच्या कराराने भाड्याने देऊन पैसे कमविण्याच्या मागे लागले आहे. यातील बहुतांशी किल्ले पश्चिम महाराष्ट्रात आहेत.

रोजगार निर्मितीचे सर्व प्रयोग फसले

किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज व पुरंदर हे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. राज्यातील सर्व किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे आश्वासन पाच वर्षांपूर्वी भाजप सेनेने महाराष्ट्राला दिले होते. परंतू आता पर्यटन व रोजगारांच्या नावाखाली हे गडकोट किल्ले भांडवलदारांना हॉटेल व लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याचा निर्णय म्हणजे रोजगार निर्मितीचे सर्व प्रयोग फसले असून राज्याची गंगाजळी रिकामी झाली असल्याचे हे लक्षण आहे. स्वराज्यात या गडकोट किल्ल्यांच्या व महिला भगिनींच्या रक्षणासाठी मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले. त्या किल्ल्यांचे पावित्र्य राखून नियोजनबद्द पध्दतीने त्यांचे संवर्धन करुन महाराजांच्या शूर कर्तबगारीचा अमुल्य ठेवा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याएैवजी त्याच पवित्र भूमीवर हे सरकार हॉटेल्स्‌ उभारुन रोजगाराच्या नावाखाली जनतेच्या अस्मिता पायदळी तुडविण्याचा आणि महिलांना नाचवून पैसे कमविण्याचा उद्योग करु पाहत आहे. या नालायक आणि निष्क्रिय सरकारला हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्रातील मावळ्यांनी आता रस्त्यावर उतरावे असे आवाहन सचिन साठे यांनी केले आहे.

किल्ले लग्न समारंभासाठी देण्याच्या निर्णयाचा मनसेने केला निषेध

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानबिंदू असलेले २५ किल्ले हेरिटेज हाॅटेल्स व लग्नसमारंभासाठी दीर्घ मुदतीच्या कराराने खासगी कंपन्याना विकण्याचा सरकारच्या संतापजनक निर्णयाचा पिंपरी चिंचवडचे मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. सरकारने निर्लज्जपणाचा कहर केल्याचा आरोपही चिखले यांनी केला आहे. या निर्णयावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध सुरु झाला आहे. याबाबत मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, ”रक्ताचे पाणी करुन बनवलेली आणि कमावलेली महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अस्मितेचा मानबिंदू असलेले गड किल्ले आहेत. भाड्याच्या सरकारने निर्लज्जपणाचा कहर करत गडकिल्ले लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याचा संतापजनक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मनसेच्या वतीने जाहीर निषेध करतो.”