गडचिरोलीकर करोडपती होणार

0

गडचिरोली : आता गडचिरोलीकर करोडपती होणार यात शंका नाही. हे कसे काय असा प्रश्‍न पडला असले तर तो बरोबरच आहे. तेंदूपान ठेकेदारांच्या मनमानीला उत्तर देत गडचिरोली जिल्ह्यातील 169 ग्रामसभांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तेंदूपानांचे संकलन करुन थेट कंपनीत विकण्याचे गडचिरोलीतील ग्रामसभांनी ठरवले आहे. यातून दलालांना मिळणारा अतिरिक्त फायदा आता ग्रामसभांना मिळेल आणि कोटींचा नफाही कमावता येईल. गडचिरोलीतील ग्रामसभांनी घेतलेला हा निर्णय संपूर्ण देशात पहिलाच निर्णय असल्याचे बोलले जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात तेंदूपानांचे संकलन केले जाते. राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र म्हणजे 78% वनक्षेत्र गडचिरोलीत आहे. या वनात मोठ्या प्रमाणात तेंदूची झाडे आहेत. जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली आणि धानोरा तालुक्यातील 169 गावातील ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदूपत्ता संकलन केला गेला. यापूर्वी तीनवेळा लिलाव प्रक्रिया केली गेली. मात्र या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार्‍या ठेकेदारांनी मिलीभगत करून प्रति गोणींचा भाव 7 ते 8 हजार रुपये देण्याचे ठरवले. मात्र ग्रामसभेने या गोणींचा भाव 13 ते 16 हजारापर्यंत विकण्याचा ठरवले होते.

ग्रामसभेचा पुढाकार
राज्यपालांच्या आदेशाने पेसा कायद्याअंतर्गत ग्रासभेला तेंदू संकलनाचे सर्वाधिकार दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामसभा तेंदू संकलन करून ठेकेदारांना विकायचे. मात्र जास्त फायद्यासाठी ठेकेदार मिलीभगत करून तेंदूपानाच्या गोणीची किंमत कमी केली. तसेच जास्त तेंदूपानांचे उत्पादन होण्यासाठी जंगलात आग लावीत होते. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जंगलाचे नुकसान होत होते. जंगलाचे नुकसान होऊ नये आणि या हंगामातून ग्रामस्थांना जास्त उत्पादन व्हावे, यासाठी ग्रामसभेने पुढाकार घेऊन स्वतः तेंदू संकलन करून ते थेट कंपनीत विकत आहेत. त्यामुळे या ग्रामसभेला कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.