गडचिरोलीत एका नक्षलवाद्याच्या खात्मा !

0

गडचिरोली-गडचिरोलीजवळील मुसपर्शी जंगलात आज शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली. यात एक नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.

२२ जानेवारीला नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील तीन आदिवासींची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर जिल्ह्यात पोलिसांनी मोठे अभियान राबवले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जांभिया) पोलीस मदत केंद्रापासून जवळच असलेल्या मुसपर्शी (छत्तीसगड) जंगलात पोलीस व नक्षलींमध्ये चकमक झाली. दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युतर देताच नक्षलवादी जंगलात पळून गेले. पोलिसांना घटनास्थळी एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दैनंदिन वापराचे साहित्यही ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, गडचिरोलीत २०१८ मध्ये सुरक्षा दलांनी ५० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तर २९ जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून १८ जणांनी आत्मसमर्पण केले. गेल्या ३८ वर्षांतील गडचिरोली पोलीस दलाची ही उत्तम कामगिरी होती.

ठिकठिकाणी लावले आहे बॅनर
नक्षलवाद्यांनी गुरुवारी रात्री ठिकठिकाणी बॅनर बांधून व झाडे आडवी टाकून वाहतूक अडवल्याने दुर्गम भागात भीतीचे वातावरण आहे. भामरागड तालुक्यातील मल्लमपोडून-कुक्कामेटा मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी नक्षलवाद्यांनी बॅनर लावला. नक्षलींनी झाडे तोडून रस्त्यावर आडवी टाकल्याने वाहतूक बंद होती. २५ ते ३१ जानेवारीपर्यंत ‘समाधान के खिलाफ प्रचार अभियान’ व ३१ जानेवारीला भारत बंदचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे. धोडरा-जुव्वी मार्गही झाडे टाकून बंद करण्यात आला आहे.