गडचिरोली। अहेरी तालुक्यातील सॅन्ड्रा जंगल परिसरातून तीन जहाल महिला नक्षल्यांना अटक करण्यात आली आहे. नक्षलविरोधी अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दल व छत्तीसगड पोलीस संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली आहे. सँड्रा जंगलात संशयास्पद हालचालीवरून पळून जात असताना या तीन महिला पोलिसांना दिसल्या. त्यांची विचारपूस केली असता सदर तिनही महिला नक्षल दलामध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.
या तीन महिला नक्षल्यांचे नाव मैनी उर्फ जिमो उंगा लाती (32) रा. पालनार ता. जि. बिजापूर (छत्तीसगड), सरिता ऊर्फ मुळे कट्टा मडकाम (23) रा. कोठमेठ्ठा ता. जि. बिजापूर (छत्तीसगड), पाकली ऊर्फ कारी बुधू गडे (28) रा. दुप्पाळ परसेगड ता. जि. बिजापूर (छत्तीसगड) आहे.
मैनी लाजी ही महिला नक्षली 2003 पासून सॅन्ड्रा दलममध्ये कार्यरत आहे. सरिता मडकाम ही 2013 पासून तर पाकली गडे ही 2012 पासून सॅन्ड्रा दलममध्ये होती. तिनही महिला नक्षलींचा अनेक चकमकीमध्ये सहभाग होता. ही कारवाई जिल्हा पोलीस व छत्तीसगड पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. या तीन जहाल महिला नक्षलींच्या अटकेमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.