गडचिरोली: गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून कुरघोडी सुरु असतानाच आता आज गुरुवारी नक्षलींनी एटापल्ली तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर लावले आहे. नक्षलींनी १९ मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले असून महिला नक्षली रामको नरोटे आणि शिल्पा दुर्वा या दोघींचा बनावट चकमकीत खात्मा करण्यात आल्याचा दावाही या बॅनरमधून करण्यात आला आहे.
एटापल्ली- गुरुपल्लीदरम्यान नक्षलींनी गुरुवारी अनेक ठिकाणी बॅनर लावले आहेत. हिंदी, मराठी आणि माडीया या तीन भाषांमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहे. यात महिला नक्षली रामको नरोटो आणि शिल्पा दुर्वा या दोघांना सी – ६० जवानांनी खोटी चकमक दाखवून ठार केल्याचा दावाही करण्यात आला आहे. या दोघींना पोलिसांनी अटक करुन जंगलात नेले आणि तिथे दोघींना ठार मारण्यात आले, असेही बॅनरमध्ये म्हटले आहे. जांभिया येथील समाज मंदिरात तसेच आश्रमशाळेजवळही नक्षलींनी बॅनर लावले होते. सरकार आणि पोलिसांचा या बॅनरमधून विरोध करण्यात आला आहे.