कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज- महागाव रस्त्यावर भीषण अपघातामध्ये एकाच गावातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हे भाजपचा मेळावा आटोपून परत येत असल्याचे बोलले जात आहे. कार्यकर्त्यांच्या सुमो कारला समोरून येणाऱ्या बसची धडक बसली. यात भाजपचे 4 कार्यकर्ते जागीच ठार झाले.
सरंबळवाडी (ता. आजरा) येथे उद्योजक रमेश रेडेकर यांनी आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी गडहिंग्लजमधील नूल येथून नामदेव चव्हाण हे आपल्या सात कार्यकर्त्यांसह गेले होते. मेळावा आटोपून परतताना गडहिंग्लज-महागाव रस्त्यावर अनिकेत हॉटेलनजीक कोल्हापूर-दोडामार्ग या बसने सुमोला जोरदार धडक दिली. त्यात सुमोचे मालक व चालक नामदेव चव्हाण, त्यांचा मुलगा मनोज चव्हाण, चंद्रकांत गरुड, आप्पा सुपले या चौघांचा मृत्यू झाला. राजू जाधव, दिलीप सुपले व राहुल सावंत हे तिघेही गंभीर जखमी आहेत.
अपघाताची माहीती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामुळे बघ्यांची गर्दी झाली आहे. तर घटनेची माहीत मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघाती वाहन बाजूला करण्याचं काम सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 5 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.